Saturday, December 21, 2024
Homeराज्यकृषी निविष्ठांची साठेबाजी रोखण्यासाठी, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके...

कृषी निविष्ठांची साठेबाजी रोखण्यासाठी, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके…

जिल्हाधिकाऱ्याकडून आदेश निर्गमित

अकोला – संतोषकुमार गवई

कपाशीच्या विशिष्ट बियाण्याची मागणी व पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई व साठेबाजीला आळा घालण्यासाठी आता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके निर्माण करण्यात आली असून, ठिकठिकाणी होणा-या विक्री व्यवहारांवर कडक नजर ठेवण्यात येणार आहे.

या पथकांनी जिल्ह्यात विक्री केंद्रांची काटेकोर तपासणी करून कुठेही जादा दराने विक्री व साठवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. तपासणीत कुठेही हयगय होता कामा नये, तसेच कुठेही अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

कृषी विभागातर्फे खरीप निविष्ठांच्या संनियंत्रणासाठी यापूर्वीच पथके स्थापन केली आहेत. तथापि, कपाशी बियाण्याच्या ठराविक वाणाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली पथके गठित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी मंगळवारी (28 मे) याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे.

या पथकांद्वारे कृषी निविष्ठांच्या विक्रीवर काटेकोर नजर ठेवण्यात येणार आहे. तालुका कृषी अधिकारी, वजन मापे निरीक्षक व पं. स. कृषी अधिकारी यांचा पथकात समावेश आहे. पथकांकडून जिल्हाभरात तत्काळ तपासणी व कार्यवाहीला सुरूवात करण्यात आली आहे.

शेतकरी बांधवांना बियाणे, खताचा सुरळीत पुरवठा होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कुठेही कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई किंवा जादा दराने विक्री होता कामा नये. अत्यावश्यक वस्तू कायदा, बियाणे कायदा व नियम, बियाणे नियंत्रण आदेश, खत नियंत्रण आदेश, कीटकनाशके कायदा व नियम, तसेच कृषी आयुक्तालयाने निर्मगित केलेल्या प्रत्येक सूचनेची अंमलबजावणी व्हावी व वेळोवेळी कार्यवाहीचा अहवाल जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांकडे सादर करावा, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: