संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन अमृतमहोत्सवा प्रसंगी हर घर तिरंगा अभियान राबविण्याकरिता प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आठवडाभर प्लॅनिंग केले. असेच प्लॅनिंग व अभियान पंतप्रधान आवास (घरकुल) करिता राबविले असते तर आज आकोट व तेल्हारा तालुक्यातील घरकुल पासून वंचित असलेल्या नागरिकांनाही हर घर तिरंगा अभियान मध्ये सहभागी होऊन मोठ्या उत्साहाने आनंद लुटता आला असता.
पण काही झारीतील शुक्राचार्य असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे दोन्ही तालुक्यातील शेकडो गरजुंचे अर्ज प्रलंबित पडलेले आहेत. हा प्रश्न मार्गी लावून घरकुल अर्ज तातडीने निकाली काढल्यास बेघर असलेले नागरिक सुध्दा हर घर तिरंगा लावून येणारा प्रजासत्ताक दिन आनंदोत्सवात साजरा करतील.
त्याकरीता आकोट-तेल्हारा तालुक्यातील बेघर असलेल्या नागरिकांना हक्काची घरे त्वरित मिळावीत अशी मागणी माजी आमदार संजय गावंडे यांनी ध्वजारोहण समारंभ प्रसंगी आमदार प्रकाश भारसाकळे, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, नप. मुख्याधिकारी आकोट श्रीमती मेघना वासनकर तसेच तहसीलदार आकोट व तेल्हारा आणि मुख्याधिकारी न.प. तेल्हारा यांना तिरंगा ध्वज सह लेखी निवेदन देऊन केली.