Sunday, December 22, 2024
Homeराज्यभावाच्या जाचाला कंटाळून बहीनीने काढला भावाचा काटा...अखेर खिंडसी तलावातील मृतकाच्या खुनाचे रहस्य...

भावाच्या जाचाला कंटाळून बहीनीने काढला भावाचा काटा…अखेर खिंडसी तलावातील मृतकाच्या खुनाचे रहस्य उलगडले…

रामटेक – राजु कापसे

१७ एप्रिलला सकाळी पोहायला जाणाऱ्यांना तलावात मृतदेह तरंगताना दिसला होता. अनोळखी मृतदेह असल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परंतु मृतकाची ओळख पटली नव्हती. चार दिवसांनंतर शवविच्छेदन अहवालावरून मृतकाची गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. परंतु ओळख पटली नव्हती.

२६ एप्रिलला नागपूर येथे मिसिंग तक्रारीवरून मृतक व्यक्ती रजत कैलास उघडे (२५, रा. आशीर्वादनगर, नागपूर) हा चटईविक्रेता असल्याची माहिती मिळाली. मृतकाची आई व नातेवाइकांनी रामटेक पोलीस स्टेशनमध्ये येऊन मृतकाचे साहित्य व कपड्यावरून ओळख पटवून तो रजत उघडे असल्याचे सांगितले. मृतदेह गहू तलाव येथील परिसरातून काढून नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मृतकावर गहू तलाव मोक्षघाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मात्र मृतकाची हत्या कोणी केली हे गुढ अद्यापही गुलदस्त्यात होते. तेव्हा सदर युवकाचा खून करुन त्याच्या खूनाचे रहस्य उलगडू नये या उद्देशाने त्याला खिंडशी तलावात फेकून दिले असे निदर्शनास आल्याने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक श्री हर्ष पोद्दार यांनी सदर रहस्यमयी खुनाचे गुढ उकलन्याकरीता तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून रामटेक पोलीसांचे ०५ पथके व स्थानिक गुन्हे शाखेचे ५ असे विवीध तपास पथके तयार करून तपास स सुरु केला होता.

याचदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकास माहिती मिळाली की, वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द केलेल्या बातमीतील मृतकाचे अंगावर गोंदविलेले वर्णन पाहुन आशिर्वाद नगर, हुडकेश्वर नागपूर येथे राहणारे श्रीमती दिपाली उघडे व त्यांची मुलगी आभा उघडे या नागपूर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये रजत कैलास उघडे वय २६ वर्ष रा. आशिर्वाद नगर, नागपूर हा हरविला असल्याची तक्रार देण्यास आले आहे.

तपास पथकाने श्रीमती दिपाली कैलास उघडे वय ५४ वर्ष व त्यांची मुलगी आभा उघडे वय २८ वर्ष हिचेसोबत संपर्क साधला व त्यांना मृतक युवकाचे फोटो दाखविले असता मृतक हा त्यांचा मुलगा रजत असल्याची ओळख दिपाली उघडे यांनी व त्यांची मुलगी आभा यांनी पोलीसांना दिली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मृतक रजत हिची आई व बहीन आभा हिला रजत बाबत विचारपुस केली असता रजत दि. १६/०४/२०२४ पासून घरी आला नाही असे त्यांनी सांगीतले की, रजत दारु पिन्याच्या सवयीचा असल्याने तो घरी कुणालाही न सांगता बरेच दिवस घरुन गायब रहात असायचा याकारणामुळे रजतची आई व बहीन यांनी तो हरविला असल्याची आजपावेतो तक्रार दिली नाही असे पोलीसांना सांगीतले.

रजत याच्या मृत्युची बातमी कळल्यावर त्याची आई व बहीन यांची वागणुक तसेच त्यांचे चेहऱ्यावरील हावभाव अतिशय सामान्य दिसून आल्याने दोघी विषयी पोलीसांच्या मनात शंकेची पाल चुकली पोलीसांना आता रजतच्या मृत्युमागे काहीतरी गुढ दडले आहे अशी खात्री वाटू लागली. पोलीसांनी तातडीने रजतच्या जवळच्या मित्रांची माहिती काढून त्यांचेकडे विचारपुस सुरु केली. तेव्हा पोलीसांना कळाले की, रजत मागील ६ महिण्यापासुन घरीच होता. दारु पिण्याच्या सवयीचा असल्याने कामधंदा करीत नव्हता. दारुच्या नशेत असल्यावर तो घरच्यांना खूप त्रास देत होता.

त्याचे घरचे लोक त्याचे त्रासाला कंटाळले होते. खात्रीशिर माहिती हाती लागल्यावर पोलीसांनी आभा व तिची आई हिच्याकडे रजत बाबत सखोल चौकशी केली तेव्हा दोघींही वेगवेगळया घटना सांगुन पोलीसांची दिशाभुल करीत असल्याचे पोलीसांना लक्षात आले. सरते शेवटी आभा हिचेवर अधिक संशय बळावल्याने तिची कसून चौकशी केली.

तिचा मोबाईल फोन तपासून तिच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला असता अत्यंत महत्वपुर्ण माहिती पोलीसांचे हाती लागली. आभा हिचा घटस्फोट झाल्यानंतर ती आई व भावाकडे तिच्या मुलासोबत रहायची. तांडापेठ येथे राहणारा अतुल राजू भामोडे वय ३१ वर्ष याचेसोबत आभा हिचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली.

यावरुन अतुल भामोडे याला विचारपुस करण्याकरीता पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने पोलीसांना माहिती दिली की, दि. १४/०४/२०२४ रोजी आभा ही स्वामीनारायण मंदीर वाठोडा येथे अतुल याला भेटली व त्याला सांगीतले की, रजत दारु पिवून आल्यावर आम्हाला खूप त्रास देवून मारहान करतो. त्याच्या त्रासाला आम्ही कंटाळलो आहे, तु त्याचे काहीतरी कर ! अतुल याला प्रियसीचा त्रास सहन झाला नाही.

त्याने तिला सांगीतले की, दोन तिन दिवस थांब मी त्याचे काहीतरी करतो. दि. १६/०४/२०२४ रोजी रजत नेहमी प्रमाणे दारु पिवून आला व घरातील सामान फेकून तमाशा सुरु केला. त्यावेळी त्याने त्याची आई ला मारहान केली. आभाची सहनशिलता पुर्णपणे संपली होती तिने त्याचक्षणी अतुल भमोडे याला फोन करुन रजत याने केलेल्या तमाशाची माहिती दिली व त्याला म्हटले की, आजच याचे काहीतरी कर, याला संपवून टाक तुला वाटेल तर मी पैसे देते.

अतुल याला पैश्याची आवश्यकता तर होतीच शिवाय त्याला प्रियसीला रजतच्या त्रासातुन बाहेर काढायचे होते. अतुल याने लगेच त्याचा मित्र पप्पू श्यामलाल बुरडे, वय २८ वर्ष रा. कळमना, नागपूर हयाला सर्व प्रकार सांगीतला व आपल्या मदतीला घेतले. अतुल याने त्याचदिवशी पप्पू याला मोटरसायकल घेवून रजतच्या घरी पाठविले व रजतला दारु पिन्याचा बहान करुन सोबत घेवून येण्यास म्हटले.

त्यानंतर अतुल याने रजतची आईला फोन करून सांगीतले की, पप्पू जवळ काही पैसे दया. पप्पू हा रजतच्या घरी गेल्यावर त्याच्या आईने पप्पू जवळ ५०००/- रुपये दिले व रजतला पप्पु सोबत पाठविले. पप्पू हा रजत याला घेवून अतुल याचेकडे आला. त्यानंतर अतुल याने रजत व पप्पू यांना दिवसभर आपल्या सोबत ठेवले.

यादरम्यान अतुल याने रजतला दारु पाजली, दारु पिल्यावर अतुल, पप्पू आणि रजत मोटर सायकलने म्हाळगी नगर चौक नागपूर येथून रामटेक येथे आले. अतुल याला रजतला जिवे ठार मारण्याऐवजी त्याचे हातपाय तोडून त्याला धडा शिकवावा असे वाटू लागले म्हणुन त्याने रजतची आई व बहीन यांना फोन केला व सांगतीले की, रजत याला खूप दारु पाजली आहे, तो खूप नशेत आहे त्याला जिवे ठार मारत नाही त्याऐवजी त्याचे हातपाय तोडतो.

परंतु रजतची बहीन आभा हिने रजत याला संपवून परत ये! तो परत आल्यावर आम्हाला खूप त्रास देईल असे अतुल याला सांगीतले. शेवटी अतुल याने प्रियसीच्या म्हणन्यानुसार रजत याचा गळा दाबवून त्याला ठार केले. दारुच्या नशेत असल्याने रजत कडून विरोध झाला नसल्याने अतुल याने सहजरित्या रजतला संपविले. त्यानंतर अतुल याने त्याचा मित्र पप्पू याचे मदतीने रजतचा मृतदेह खिंडशी तलावात फेकून दिला.

यानंतर अतुल आणि पप्पू हे दोघे आभा हिला भेटायला त्यांच्या घरी गेले व आभा आणि तिच्या आईला रजत याला जिवे ठार केल्याची माहिती दिली. त्यावर आभा हीने अतुल याला ५०००/- रुपये दिले. ते पैसे अतुल आणि पप्पू यांनी आपसात वाटून घेतले. अतुल आणि पप्पु हे सराईत अपराधी असल्याचे पोलीसांना तपासादरम्यान माहिती मिळून आली.

भावाच्या त्रासाला कंटाळून बहीणीने प्रियकराला खुनाची सुपारी दिली या रहस्यमयी घटनेचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पोलीसांनी दिवसरात्र सतत तपास करुन गुन्हा उघडकीस आणला. सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार व अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रमेश बरकते यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री ओमप्रकाश कोकाटे,

सहा. पोलीस निरीक्षक, किशोर शेरकी, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखडे, बटूलाल पांडे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर राऊत, दिनेश आधापूरे, इक्बाल शेख, विनोद काळे, प्रमोद भोयर, संजय बांन्ते, रोशन काळे, नितेश पिपरोदे, रोहण डाखोरे, मिलींद नांदुरकर, अरविंद भगत, मयुर ढेकळे, अमृत किनगे, विपीन गायधने, विरेन्द्र नरड,

संजय भरोदीया, सतिष राठोड, राकेश तालेवार, नितु रामटेके, अमोल कुथे, सुमीत बांगडे, आशुतोष लांजेवार तसेच पोलीस स्टेशन रामटेकचे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत लांजेवार, हरीश्चंद्र मोरे, पोलीस अंमलदार अमोल इंगोले, मंगेश सोनटक्के, धिरज खंते, योगेश कुईटे, प्रफुल रंघई यांनी पार पाडली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: