नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेड जिल्हा बालविवाह मुक्तीकडे वाटचाल करीत असताना नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात बालविवाहाच्या एकाच दिवशी घडणा-या तीन घटनांना महिला व बाल विकास विभाग व जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने रोखण्यात यश आले. बाल विवाह रोखण्यासाठी ग्राम बाल संरक्षण समितीने आपली भूमिका कर्तव्यदक्षपणे पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले
नांदेड जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे अथक परिश्रम घेत आहेत. जिल्ह्यात अजानतेपणी बालविवाह घडत असल्याच्या तक्रारी महिला बाल विकास विभागास प्राप्त होताना दिसून येत आहेत. जिल्ह्यात बालविवाह थांबविण्यासाठी महिला व बाल विकास विभाग कसोशिने प्रयत्न करीत असून यासाठी महत्वाचे योगदान देत आहे.
परंतु नुकतेच नांदेड जिल्ह्यातील मुखेड व कंधार येथे उच्च शिक्षित मुलासमवेत अल्पवयीन मुलीचे बालविवाह होत असल्याबाबतची गोपनीय माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली. हे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित यंत्रणाना तात्काळ निर्देश दिले.
त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.आर.कांगणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी सदर घटनेची गोपनियरित्या शहानिशा करुन कर्मचा-यांना घटनास्थळी पाठवून होणारे बालविवाह समुपदेशनाच्या माध्यमातून थांबविण्यात आले.
हे बालविवाह रोखण्यात पोलीस प्रशासनाने अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे हे बालविवाह रोखणे सहज शक्य झाले. हे बाल विवाह रोखण्यासाठी कल्पना राठोड, शितल डोंगे, ऐश्वर्या शेवाळे, दिपाली हिंगोले, निलेश कुलकर्णी यांचे महत्वाचे योगदान लाभले.