आकोट – संजय आठवले
जमीन खरेदीचा व्यवहार अचानक रद्द करून त्यापोटी घेतलेल्या रकमेचे धनादेश बँकेत अनादरीत झाल्याने फिर्यादीचे तक्रारीवरून आकोट न्यायालयाने तीन प्रकरणांमध्ये आरोपीस एकूण ४८ लक्ष ४५ हजार रुपये दंडासह चार महिने कारावासाची शिक्षा फर्मावली आहे.
प्रकरणाची हकीगत अशी कि, आकोट शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर कैलास जपसरे यांनी सचिन खडेकार याचेशी त्याचे जमिनीचा सौदा केला. हा व्यवहार रेणुका डेव्हलपर्सचे मार्फत केला गेला. त्यापोटी डॉक्टर जपसरे यांनी सचिन खडेकार याला ३५ लक्ष रुपये अदा केले. मात्र त्यानंतर काही कारणाने हा व्यवहार रद्द करण्यात आला. त्यामुळे व्यवहारातील रक्कम परत करावी लागली.
त्याकरिता खडेकार याने १२/१२ लक्ष रुपयांचे दोन व ११ लक्ष रुपयांचा एक असे तीन धनादेश डॉक्टर जपसरे यांना दिले. हे धनादेश रीतसर बँकेत जमा करण्यात आले. मात्र संबंधितांचे बँक खात्यात जमा रोकडच नसल्याने हे तिनही धनादेश अनादरीत झाले. त्यामुळे व्यथित झालेल्या डॉक्टर जपसरे यांनी आकोट न्यायालयात धाव घेतली. तिथे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी आकोट बी.बी. चौहान यांचेसमोर हे प्रकरण चालविण्यात आले.
यावेळी फिर्यादीची बाजू एडवोकेट दीपक वर्मा व एडवोकेट आर. के. शर्मा यांनी मांडली. फिर्यादीचे वतीने त्यांनी सबळ पुरावे व सक्षम कागदपत्रे कोर्टा समोर सादर केले. त्यानंतर करण्यात आलेल्या युक्तिवादात या वकीलद्वयांनी सक्षमपणे फिर्यादीची बाजू मांडली. न्यायालयाने सदर युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी रेणुका डेव्हलपर्स मार्फत सचिन पुरुषोत्तम खडेकार ह्यास दोषी ठरविले. त्यानंतर उपरोक्त तीनही प्रकरणात आरोपीस एकूण ४८ लक्ष ४५ हजार रुपयांचा द्रव्यदंड, व्याज व कोर्टाचा खर्च आणि चार महिने कारावास अशी शिक्षा ठोठावली. सोबतच हा दंड न भरल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगण्याचाही फैसला दिला. या तीनही प्रकरणात फिर्यादीचे वतीने एडवोकेट दीपक वर्मा व एडवोकेट आर. के. शर्मा यांनी कामकाज पाहिले.