Sunday, December 22, 2024
Homeराज्यवादळी पावसाने हजारो कोंबड्यांचा मृत्यू; ७ लाखांचे नुकसान - सिरसो येथील प्रकार...

वादळी पावसाने हजारो कोंबड्यांचा मृत्यू; ७ लाखांचे नुकसान – सिरसो येथील प्रकार…

मूर्तिजापूर तालुक्यात गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने कहर केला असून तालुक्यातील फळ, भाजीपाला यासह सिरसो येथील कुक्कुटपालन केंद्रातील हजारो कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याने ७ ते ८ लाखाचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने व वादळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिरसो येथील प्रतीक व आकाश राजेंद्र मेहरे या दोघा भावांनी शेतीसाठी पुरुक व्यवसाय म्हणून तीन वर्षांपूर्वी लाखो रुपयांचे भांडवल उभारुन कुक्कुटपालन पालन व्यवसाय सुरु केला.

या केंद्रात हजारो पक्षी वाढवून त्याची विक्री करायचे परंतु २९ एप्रिल रोजी रात्री मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस आल्याने कुक्कुटपालन शेडला ऊन, वारा, पाऊस यापासून पक्षांच्या रक्षणासाठी लावलेले प्लॅस्टिक पडदे वादळाने उडून गेल्याने पोल्ट्री फॉर्म मध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संपूर्ण पक्षी भिजले. यात त्यांना बसण्याठी अंथरलेले कुटार व खाद्य ही भिजले.

रात्रभर प्रचंड वादळ आणि पाऊस सुरू असल्याने भिजलेल्या तीन हजारांच्यावर कोंबड्यांचा थंडीने कुडकुडून मृत्यू झाला. पाच हजारांहून अधिक पक्षी असलेल्या पोल्ट्री फॉमधील ३ हजार कोंबड्याचा मृत्यू झाल्याने प्रतीक व आकाश मेहरे या दोन भावंडांचे ७ ते ८ आठ लाखांचे नुकसान झाले आहे.वडीलांचे छत्र हरवल्यावर या दोन तरुण भावंडानी बॅंकेचे कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला होता परंतु अचानक आलेल्या वादळी पावसाने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ते हवालदिल झाले आहेत.

आम्ही दोघा भावंडांनी मोठ्या मेहनतीने कुक्कुटपालनाचा व्यवसाय उभा केला होता. अवकाळी पावसाने व वादळाने हजारो पक्षी मृत्यूमुखी पडल्याने किमान ७ ते ८ लाखांचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाने मदत करावी हीच अपेक्षा आहे.
-प्रतीक राजेंद्र मेहरे, सिरसो ता. मूर्तिजापूर

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: