मुंबई – गणेश तळेकर
यंदाचा प्रेरणा गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, नाट्यसमीक्षक आणि लेखक अरूण घाडीगावकर यांना जाहीर झाला आहे. १९६८ साली नरेंद्र बल्लाळ यांच्या ‘नवल रंगभूमी’मध्ये त्यांनी नेपथ्याची जबाबदारी सांभाळत नाटकांत भूमिकाही केल्या. मराठी साहित्य विषयात, प्रथम वर्गात एम्. ए. करून, आयडीबीआय बँकेत अधिकारपदाची नोकरी सांभाळून त्यांनी साप्ताहिक ‘लोकप्रभा’मधून ‘रंगभूमी’ हे नाट्यप्रयोग परीक्षणाचं सदर तब्बल २४ वर्षं सलगपणे लिहिलं.
‘भरतशास्र’ सारख्या नाट्यविषयाला वाहिलेल्या मासिकाचं उपसंपादक आणि संपादकपद त्यांनी भूषविलेलं आहे. ‘दीपावली स्पंदन’सारख्या दिवाळी विशेषांकाच्या संपादनात सलग तीन वर्षं ‘सर्वोत्कृष्ट दिवाळी अंका’ची पारितोषिकंही त्यांना प्राप्त झाली आहेत. रंगभूमीवरील किश्श्यांची त्यांनी लिहिलेली ‘रंगप्रसंग’ आणि ‘प्रसंगरंग’ ही दोन्ही पुस्तकं वाचकप्रिय ठरलेली आहेत. आत्मचरित्रांसाठी त्यांनी केलेली शब्दांकनही गाजलेली आहेत.
अलीकडेच त्यांनी संपादित केलेली ‘भक्ती पंथेचि जावे’ (हे भक्ती बर्वेंच्या लेखांचं संपादन) आणि ‘या मंडळी सादर करूया’ (हे जे. जे. तील कलावंत मंडळींच्या अनुभवावरील लेखांचं पुस्तक) ही प्रकाशित झालेली आहेत. मान्यवर लेखकांच्या पुस्तकांनाही त्यांनी प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. अनेक वर्तमानपत्रं, नियतकालिकं, पुस्तकांमधून त्यांचे रंगभूमी विषयावरील लिखाण प्रसिद्ध झालेलं आहे.
अशा अरूण घाडीगावकर यांना यंदाचा प्रेरणा गौरव पुरस्कार रविवार, दिनांक ५ मे २०२४ रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात होणाऱ्या ‘बाल नाट्य महोत्सवा’त ज्येष्ठ अभिनेते, नाटककार, महाकादंबरीकार श्री. अशोक समेळ यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी सौ. संजीवनी समेळ, सौ. ऊर्मिला लोटके व श्री. सतीश लोटके यांचीही सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
चित्रा पावसकर, अशोक पावसकर, प्रेरणा थिएटर्स, मुंबई