Sunday, December 22, 2024
Homeराज्ययावेळी अकोल्यात आंबेडकरांचे आव्हान आहे तगडे…पेलतील का सावरकर, भारसाखळे अन् पिंपळे?…

यावेळी अकोल्यात आंबेडकरांचे आव्हान आहे तगडे…पेलतील का सावरकर, भारसाखळे अन् पिंपळे?…

आकोट – संजय आठवले

अकोला लोकसभा मतदारसंघाचे पारंपारिक उमेदवार ॲड. आंबेडकर यांनी सर्वात आधी आपली उमेदवारी घोषित करून लढाईचे संकेत दिले आहेत. सोबतच त्यांनी महाआघाडीत जाण्याची तयारी केल्याने त्यांच्या मित्र पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या समशेरी म्यान केल्या असून भाजपच्या गोटात मात्र उमेदवार बदलीचे वारे वाहत असल्याने त्या ठिकाणी अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु येणारा उमेदवार नवखा राहणार असल्याने त्याच्या विजयाची मदार जिल्ह्यातील भाजप आमदार सावरकर, भारसाकळे आणि पिंपळे यांचेवर राहणार असल्याचे मात्र निश्चित आहे.

यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारण्याची व्यूहनीती महाआघाडी कडून तयार होत आहे. त्याकरिता महाराष्ट्रातील लहान मोठ्या पक्षांना आपल्यात सामावून घेण्याचे धोरण महाआघाडीने आखलेले आहे. त्या माध्यमातून भाजप समोर एकास एक उमेदवार देण्याचा महाआघाडीचा मानस आहे.

अशा स्थितीत अगोदरच अकोल्यावर आपला दावा ठोकून बाळासाहेब आंबेडकर यांनी महाआघाडीशी सोयरीकीचे संकेत दिलेले आहेत. गत ४० वर्षापासून अकोला हे त्यांचे हक्काचे मैदान राहिलेले आहे. त्यामुळे महाआघाडीशी त्यांचे जुळो वा न जुळो ते अकोल्यातूनच लढणार ही काळ्या दगडावरील पांढरे रेघ आहे. त्याच अनुषंगाने मतदारसंघात त्याची बांधणी केव्हाच सुरू झालेली आहे.

याच दरम्यान महाआघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रशांत गावंडे, डॉ. अभय पाटील, अशोक अमानकर या दिग्गजांनी आपल्या परीने लोकसभा उमेदवारी करिता तयारी सुरू केली होती. दुसरा घटक पक्ष शिवसेना ठाकरे मधूनही कळत नकळत लोकसभा लढविण्याचे सूर निघत होते. परंतु आंबेडकर ठाकरे मिलन होताच ते सुर निघणे तेंव्हाच बंद झाले. मात्र काँग्रेसवाले उमेदवारीची आशा बाळगून होते.

अशातच आंबेडकर महाआघाडीत सामील झाल्याने अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनेही आपल्या परजत्या समशेरी म्यान केल्या आहेत. एकीकडे अशी स्पष्टता होत असताना महायुतीत मात्र अस्पष्टता कायम आहे. जुने ते सोने कि नवे ते हवे असा सूरपारंब्यांचा खेळ महायुती अर्थात भाजपमध्ये सुरू आहे.

अकोल्याचा इतिहास पाहू जाता अकोला जिल्हा भाजपवर विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचा एकछत्री अंमल आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे खासदार धोत्रे जरी प्रत्यक्ष मैदानात नसले तरी त्यांची संपूर्ण धुरा आमदार रणधीर सावरकर खंबीरपणे सांभाळून आहेत. आमदार गोवर्धन शर्मा यांचे निधनानंतर जिल्ह्यातील भाजपचे उर्वरित दोन आमदार भारसाकळे आणि पिंपळे हे सावरकरांच्या शब्दाबाहेर नाहीत. जिल्हा कार्यकारीणीवरही त्यांचाच वचक आहे.

त्यामुळे आगामी खासदार आपल्याच मर्जीतील किंबहुना आपल्याच गोतावळ्यातील असावा, ही त्यांची सुप्त मनीषा आहे. परंतु या बाबतीत त्यांना शह आणि मात दोन्ही मिळण्याची अधिक शक्यता आहे. कारण भाजप श्रेष्ठींनी ओबीसीचा जप चालविला असल्याने यावेळी ओबीसी परंतु नव्या दमाच्या शोधात श्रेष्ठी आहेत. त्यामुळे हा उमेदवार नवखा असणार आहे.

त्यामुळे साहजिकच त्याची पाटी कोरी असणार आहे. परिणामी त्याच्या विजयाची मदार सावरकर, भारसाखळे आणि पिंपळे यांचेवर अधिक असणार आहे. यामध्ये ॲड. विशाल गणगणे, आमदार प्रकाश फुंडकर, डॉ. रणजीत पाटील आणि नारायणराव गव्हाणकर यांचे नावांची जोरदार चर्चा आहे. परंतु यापैकी कुणाचेही येणे सावरकर गटाकरीता मोठा धक्का ठरणार आहे. यातील कुणालाही मोठे करणे हे सावरकरांकरीता स्वतःहून सवता सुभा निर्माण करणारे ठरणार आहे.

पण जर असे करीत नाहीत तर लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभा ऊमेदवारीकरिता या परफॉर्मन्सवरच पास नापास चा निकाल राहणार आहे. लोकसभेत चांगले गुण मिळाले तरच विधानसभा उमेदवारीची परीक्षा उत्तीर्ण होता येणार आहे. त्यामुळे विद्यमान तिन्ही आमदारांची धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही, अशी अडकित्त्यात सापडल्याची गत होणार आहे.

येथे उल्लेखनीय आहे कि, केवळ एक वर्षांपूर्वीच एक मोठे पातक या तिन्ही आमदारांच्या प्रगती पुस्तकात समाविष्ट केले गेले आहे. त्याच्या जखमा अद्यापही ओल्या आणि ठणकत्या आहेत. ते पातक म्हणजे पदवीधर मतदारसंघातील डॉ. रणजीत पाटील यांचा पराभव. ही उमेदवारी साक्षात देवेंद्र फडणवीस यांची होती. भाजपने सर्वाधिक मतदार नोंदणी करूनही हा पराभव झाला.

याची संपूर्ण जबाबदारी सावरकर, भारसाकळे आणि पिंपळे या तिघांचे वर असल्याची खातरजमा दस्तूर खुद्द फडणवीस यांनी केल्याचे बोलले जाते. त्यामुळे या पराभवाने डॉ. रणजीत पाटील जरी दुखावले असले तरी फडणवीस मात्र अत्यंतिक तळमळले आहेत. त्यातच योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करण्यात आणि राजकारणात कशाचेही वावडे न मानण्यात फडणवीस पक्क्या गुरुचे केले आहेत. त्यात लोकसभेतही असा दगाफटका केल्यास ते ह्या तीनही आमदार आणि त्यांच्या कंपूला विलक्षण महागात पडणार आहे.

अशा स्थितीत या तिन्ही आमदारांसमोर ॲड. आंबेडकरांचे जबरदस्त आव्हान उभे ठाकले आहे. यावेळी हे आव्हान पूर्वीइईतके सहज असणार नाही. २०१९ मध्ये संजय धोत्रे यांना ५ लक्ष ५४ हजार ४४४ मते मिळून ते विजय झाले. ॲड. आंबेडकर २ लक्ष ७८ हजार ८४८ मते घेऊन द्वितीय क्रमांकावर तर काँग्रेस २ लक्ष ५४ हजार ३७० मते घेऊन तृतीय स्थानी स्थिरावली. काँग्रेस आणि आंबेडकर मिळाले असते तर त्यांची बेरीज ५ लक्ष ३३ हजार ११८ होते.

म्हणजे धोत्रे केवळ २१ हजार ३१६ मतांनी आघाडीवर राहतात. या निवडणुकीत आंबेडकर आणि महाआघाडी एकत्रित आल्यास हा फरक भरून काढणे जराही अवघड नाही. त्यातच विद्यमान खासदारांची अगदी मंत्री असतानाही असलेली अकर्मन्यता पाहता तर नाहीच नाही. त्यानंतर विचार होतो सावरकर, भारसाकळे आणि पिंपळे यांचे कामांचा. तर तिथेही जनक्षोभाचेच अधिक्य आहे.

एक प्रलंबित विषय आहे अकोला आकोट हरिसाल मार्गाचा. गेली अनेक वर्षे हा महामार्ग थंडबस्त्यात आहे. येथे विशेष उल्लेखनीय आहे कि, हा महामार्ग साधासुधा नाही तर चक्क विकासाचा खजिना आहे. हाच महामार्ग नांदेडहून आंध्र प्रदेशातील हैदराबादला जोडतो. तर नांदेडहून हिंगोली, वाशिम, अकोला, आकोट आणि मध्य प्रदेशातील हरीसालला जोडतो. दुसरा मार्ग आहे अकोला आकोट खंडवा हा रेल्वे मार्ग.

हा मार्गही साधासुधा नाही हा चक्क काचीगुडा ते अजमेर अर्थात आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चक्क चार राज्यांना जोडणारी विकास गंगा आहे. तिसरा मार्ग आहे हवाई मार्ग. अकोल्यातून तोही बंद आहे. मात्र अकोल्यातील खासदार आणि सत्ताधारी भाजप आमदार यांनी या प्रश्नी ओठही हलविलेला नाही. परिणामी अकोला मतदारसंघ कितीतरी उद्योग, व्यवसाय, रोजगार यांना मुकला आहे. याची उत्तरे खासदार आणि त्यांचे प्रचारक आमदार यांना जनतेला द्यावी लागणार आहेत.

इथे आणखी उल्लेखनीय आहे कि, अकोल्यात गडकरी येऊन गेले. खुद्द देवेंद्र फडणवीस अकोल्याचे पालकमंत्री राहून गेले. पण हे तीनही मार्ग उपेक्षितच राहिले. त्यामुळे आता खुद्द मोदींनीच अकोल्यातून लढावे असे लोक बोलू लागले आहे. पण अकोल्यात त्यांचाही मोठा वांदा होणार आहे.

काळ्याधनाची वापसी, नोटबंदी, दरवर्षी दोन करोड नोकऱ्या, शेतकऱ्यांची दुप्पट उत्पादन वाढ, डिझेल पेट्रोल दर, गॅस सिलेंडरचे दर, वाढती महागाई, स्लीपर घालणाऱ्यांकरिताही विमान प्रवास, शेतकरी कर्जमाफी, भ्रष्टाचारांचे आरोपी अजित पवारांना आलिंगन या प्रश्नांचा त्यांनाही सामना करावा लागणार असल्याचेही लोक बोलत आहेत. हेच मुद्दे घेऊन सावरकर भारसाकळे आणि पिंपळे यांना लोकसभेचा निवडणूक प्रचार करावा लागणार आहे. त्यासोबतच त्यांना आपल्या मतदारसंघातील प्रगतीही जनतेसमोर मांडावी लागणार आहे.

या प्रगतीबाबत दोन-तीन महिन्यांपूर्वी नागपूर संघ कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता बैठकीत स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी नाक मुरडलेले आहे. नुकताच जिल्ह्यातील आमदारांच्या कामांचा भाजपकडून सर्वे करण्यात आला आहे. त्यातही हे विद्यमान आमदार माघारले आहेत. जिल्ह्यातील संघ संघटनांनीही या आमदारांच्या कामांवर नाखुशी प्रकट केलेली आहे.

त्यामुळे हे तीनही आमदार जनतेसमोर येऊ शकणार नाहीत अशी एकंदर स्थिती आहे. त्यामुळे जनतेसमोर जाण्याची सोय नाही, नवीन नेतृत्वाचा उदय होऊ द्यायचा नाही, होऊ न दिल्यास मोदी फडणवीस सोडणार नाहीत. अशा दारूण अडचणीत राहून हे आमदार ॲड. आंबेडकरांचे आव्हान कसे पेलतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: