Wednesday, January 1, 2025
Homeसामाजिकअसे लढले गेले…२९ नोव्हेंबर १८०३ चे मराठा इंग्रज युद्ध...अडगावची (सिरसोली) लढाई...

असे लढले गेले…२९ नोव्हेंबर १८०३ चे मराठा इंग्रज युद्ध…अडगावची (सिरसोली) लढाई…

अकोला प्रतिनिधी

23 सप्टेंबरच्या 1803 असायच्या लढाईनंतर मराठा सैन्य अजूनही उत्तरेकडे सरकत होते. 27 नोव्हेंबर रोजी आर्थर वेलस्लीने अकोला येथील कर्नल स्टीव्हन्सनशी संपर्क केला. मराठा सैन्य असलेल्या जागेविषयी माहिती घेतली आणि त्याच्याबरोबर उत्तरेकडे कुच करता झाला.

इंग्रजांच्या घोडदळ स्काउट्स मार्गक्रमण करीत असताना त्यांना अडगावच्या दक्षिणेकडे सिरसोली च्या पांढरीत तैनात असलेल्या मराठा सैन्याचा ठावठिकाणा लागला. याठिकाणी ग्वाल्हेरचे महाराजा मराठा दौलतराव सिंदिया, यांचे घोडदळ, उजवीकडे तर नागपूरकर रघुजीराजे भोसलेंचे १५ बटालियन पायदळ सुमारे ८,००० सैन्य व राजाचे घोडदळ सैन्य डावीकडे होते.

यासोबतच मराठ्यांनी 38 तोफा तैनात केल्या होत्या, त्यातील प्रामुख्याने 18 पाउंडर स्थानिक निर्मिती च्या होत्या. वेलस्लीने आपले आणि स्टीव्हनसनचे सैन्य एका नाल्याच्या(आजची विद्रुपा नदी) दोन्ही काठावर तैनात केले.हा नाला पाथर्डी गाव उत्तरेकडील अडगाव दरम्यान वाहत होता.

स्टीव्हनसन पश्चिमेकडे होता, हत्तीवरून कमांडिंग करत होता. त्याच्याकडे 2 मद्रास घोडदळ रेजिमेंट आणि म्हैसूरचे टिपू सुलतान याच्या सैन्यातील माजी सैन्य, ज्यांनी कंपनीत नोकरी स्वीकारली होती,सुमारे 2,000 अनियमित घोडदळ होते, त्यामध्ये 94 वी फूट (किंग्स इन्फंट्री) आणि मद्रास इन्फंट्रीच्या पाच बटालियन. पूर्वेकडील बाजूस आर्थर वेलस्ली होता. त्याच्या सोबत किंग्ज 19 व्या लाइट ड्रॅगन्स, मद्रास घोडदळाच्या तीन रेजिमेंट्स, इंग्रजी 74व्या आणि 78व्या बटालियनचे पायदळ आणि मद्रास इन्फंट्रीच्या तीन बटालियन तैनात होते.

चकमकी करीता पुढे मद्रास इन्फंट्रीच्या दोन पायदळ बटालियन होत्या. सात ते नऊ फूट उंच असलेल्या बाजरी पिकांमधून सैन्य शिस्तीत मार्गक्रमण करीत संपूर्ण सैन्य पुढे सरकत होते, उंच बाजरीच्या धांड्यांमुळे घोड्यावर बसलेले अधिकारीच फक्त समोरचे पाहू शकत होते. याची चाहूल लागताच 3,000 यार्डच्या अंतरावर असलेल्या मराठा तोफांनी गोळीबार करणे सुरू केले परंतु त्यांची हल्ला करण्याची रेंज कमी असल्याने इंग्रजी सैन्याचे फारसे नुकसान झाले नाही.

आणि मराठा सैन्यापासून 500 यार्डांवर ब्रिटीश सैन्याने आपली पायदळ बटालियन च्या मध्ये बंदुकांसह सैन्य तसेच तोफखाना एक रांगेत तैनात करण्यात यश मिळवले.एका तोफेला मराठा तोफेने उडविले आणि ते खेचणारे दहा बैल घाबरले, आणि चकमकीच्या रेषेतून चौफेर उधळले यामुळे ब्रिटिश सैन्य विखुरले व गोंधळले.

याबाबीचा फायदा घेऊन सिंधे सरकारच्या घोडदळाने स्टीव्हनसनच्या डावीकडे हल्ला केला. मात्र ब्रिटिश 94 व्या बटालियनने मराठा सैन्याला चौफेर घेरून गोळीबार केल्याने मराठा घोडदळला माघार घ्यावी लागली. मराठ्यांची माघार बघून स्वतः मैदानात असलेल्या वेलस्लीने आता आपल्या पायदळ सैनिकांना आडवे होण्याचे आदेश दिले आणि भोसल्यांच्या घोडदळांना डावीकडे चार्ज करण्यासाठी आपल्या घोडदळांना पाठवले, यामुळे मराठा सैन्याची दानादान उडाली आणि मैदान सोडून जाण्याची पाळी आली.

वेलस्लीने आपल्या माणसाला उभे राहून तोफांना घेऊन पुढे जाण्याचा आदेश दिला, एका मिनिटाला तीन किंवा चार फेऱ्या मारणाऱ्या या तोफा मोठ्या कॅलिबरच्या असूनही निकृष्ट दर्जाच्या असलेल्या मराठा तोफांना शांत करण्यात कमी पडत असल्याने छुपा हल्ला करून मराठा तोफा नष्ट करण्याचे उद्देशाने वेलस्लीने बटालियनच्या तोफांना खड्ड्यांमध्ये हलवले.आणि हल्ला चढविला.

याचा उद्देश कंपनीचे सैन्य मराठा लाइनपासून सुमारे 100 यार्डांवर पोहचविणे होता कारत या ठिकाणावरून पायदळ बटालियनच्या बंदुकांच्या मदतीने प्लाटून गोळीबार करण्यास सोपे होऊन भेदक मारा करण्यासाठी आणि ते त्यामध्ये यशस्वी झालेही भेदक मारा करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे मराठा सैन्य गारद झाले रक्ताचे पाट वाहू लागले यामुळे मराठा सैन्याला गाविलगडच्यि दिशेने माघार घ्यावी लागली. बेरारचे राजे रघुजीराजे भोसलेंचे भाऊ शुरविर,रणधुरंधर मनोहरबापु भोसले जे मन्याबापु म्हणून परिचित होते.

मराठ्यांची माघार झाकण्यासाठी मनू बापू रणांगणात उतरले सोबत अनेक शुरविर लढवय्ये होते यामध्ये करताजीराव जायले यांचा समावेश होता सोबतच समोरासमोर युद्धात तरबेज ‘अरब’ (पर्शियन आणि तुर्की सैन्य) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन बटालियन पुढे आणल्या, ज्यांनी वेलस्लीच्या केंद्रावर हल्ला केला. मात्र त्यांनाही 74 व्या आणि 78 व्या बटालियन च्या गोळीबारावर विजय मिळविता आला नाही आणि बरेच जण मारले गेले.

यामध्येच शूरवीर सरदार कर्ताजीराव जायले सुद्धा धारातीर्थी पडले होते. बरेच जण मारल्या गेले होते.ब्रिटीशांनी सर्व मराठ्यांच्या तोफा ताब्यात घेतल्या, त्या स्वत: वापरण्यासाठी पुरेशा दर्जाच्या नसल्याने त्या दुहेरी गोळ्या घालून नष्ट केल्या गेल्या. मराठा सैन्याकरिता रसद घेऊन येणाऱ्या गाड्या आणि अनेक बैल व हत्तीही ताब्यात घेण्यात आले.

या युद्धात मोठ्या प्रमाणात जिवित हानी झाली ब्रिटिश आणि मराठ्यांचे युद्धात ब्रिटिश सैन्याची सर्वात मोठी हानी या ठिकाणी झाली होती.

EIC 15 ब्रिटिश अधिकारी आणि 31 मद्रासी ठार, एकूण 315 ठार तर 500 चे वर जखमी झाले. मराठे किती ठार झाले माहीत नाहीत पण कदाचित 1,000 हून अधिक ठार झाले असावेत आणि बरेच जखमी झाले.

आर्थर वेलस्ली (सप्टेंबर 1804 पासून सर आर्थर, 1809 पासून व्हिस्काउंट वेलिंग्टन, 1814 पासून ड्यूक ऑफ वेलिंग्टन) फेब्रुवारी 1797 मध्ये वयाच्या 28 व्यावर्षी कर्नल म्हणून भारतात आले आणि 1805 मध्ये मेजर जनरल म्हणून ते निघून गेले.

1808 ते 1814 पर्यंत पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये फ्रेंच सैन्याला पराभूत करण्यासाठी आणि शेवटी 1815 मध्ये वॉटरलू येथे नेपोलियनला पराभूत करण्यासाठी मराठा युद्ध निती वापरली होती.ती मराठ्यांची युद्ध करण्याची कला त्यांनी भारतात मराठ्यांसोबत झालेल्या युद्धात अभ्यासली होती. मित्र राष्ट्रांना सहकार्य कसे करायचे तेही ते भारतातच शिकले होते.

स्वतःच्या देशात कार्यरत असलेल्या गनिमांना कसे सामोरे जायचे, कठीण परिस्थितीत कसे काम करायचे. अत्यंत तीव्र हवामानात रस्ते नसलेला भूप्रदेश अश्या कठिण परिस्थिती मध्ये आपले सैन्य तंदुरुस्त आणि निरोगी ठेवून शेतात सैन्याची देखभाल आणि त्यांच्या गरजांची पूर्तता कशी करावी. हे मराठा युद्धनिती शास्त्र मी आत्मसात केले या नितीचा वापर करून मी नेपोलियन चा पराभव केला. असे आर्थर वेलस्लीने लिहून ठेवलेआहे. यासंदर्भात सिरसोली येथे अभ्यास दौऱ्यावर आले असता सेवानिवृत्त ब्रिटिश सैन्य अधिकारी मेजर गार्डन कोरीगन यानी आर्किटेक्ट अनंत गावंडे यांना दिली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: