राज्यात ड्रग्जची खुलेआम विक्री, महिला अत्याचार, सायबर गुन्ह्यात वाढ, ऑनलाईन व बनावट लॉटरींचा सुळसुळाट.
सरकारच्या नाकर्तेपणामुळेच राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ.
कायदा सुव्यवस्थेवर चर्चा सुरु असताना गृहमंत्र्यांसह वरिष्ठ मंत्री सभागृहात अनुपस्थित.
आरक्षणावरुन मराठा-ओबीसी समाजात पेटवलेला वणवा आता थांबला पाहिजे.
नागपूर – राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जंगलराज म्हणून ज्या राज्यांची ओळख आहे तशीच परिस्थिती महाराष्ट्रात झाली आहे. महिला अत्याचार, बलात्कार, अपहरण, खून, अंमली पदार्थांचा खुलेआम व्यापार सुरु आहे.
नागपूर, पुणे, मुंबई या शहरात अवैध बंदुकाही मोठ्या प्रमाणात आढळल्या आहेत. गृहमंत्र्यांचा पोलीस प्रशासनावर वचक राहिलेला नसून गुन्हेगार मोकाट आहेत. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा सरकार चौफेर हल्ला केला ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र आता कायद्याचे राज्य राहिले नाही. नागपूर शहरातील गृहमंत्री आहेत त्याच शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणाच वाढ झाली आहे. नागपूर शहरातील गुन्ह्याचा दर मुंबई, पुण्यापेक्षा जास्त आहे. नागपूर गुन्हेगारीच्या बाबतीत देशात सहाव्या क्रमांकावर आहे.
नागपुरात पार्किंगमधून वाहने चोरीस जात आहेत. राज्यात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे पण गुन्ह्याची उकल होण्याचे प्रमाण कमी आहे. ऑनलाईन लॉटरी व बनावट लॉटरींचा सुळसुळात झाला आहे. या बनावट लॉटरीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्थ झाले आहेत, लॉटरीत पैसे हरल्याने अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. तपासणीच्या नावाखाली वाहन धारकांची व चालकांची लुट केली जात आहे. परराज्यातून अवैध दारुची वाहतूक व विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
पनीर, दूध, मावा पदार्थातील भेसळ रोखण्यात अपयश आले आहे. अवैध बांधकाम व त्यातून भ्रष्टाचार वाढला आहे. राज्यात गुटखा बंदी असतानाही गुटखा व सुगंधी तंबाखूची विक्री सुरु आहे. ड्रग्ज, चरस, गांज्याची सर्रास विक्री होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येते ते गुजरात राज्यातून, त्यावर नियंत्रण नाही. मुंबईत महिला अत्याचाराच्या ४ हजारांपेक्षा जास्त घटनांची नोंद झाली आहे.
बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये राज्यात वाढ झालेली आहे, अनेक गुन्ह्यांची नोंदही होत नाही. राज्यात २०२२ सालात ३९६५ अवैध बंदुका सापडल्या आहेत. पुण्यात २१० मुंबईत २७४ तर नागपूरात ५५७ अवैध बंदुका सापडल्या आहेत, हे आकडे सरकारचे आहेत, केवळ आरोप प्रत्यारोपाचा हा प्रश्न नाही तर हे राज्य कायद्यानुसार चालले पाहिजे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात गुन्हेगाराचे प्रमाण वाढले हे नाकारता येणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, फुले, आंबेडकरांच्या विचाराच्या राज्यात आज मराठा-ओबीसी समाजात तेढ निर्माण केली आहे. आज दोन्ही समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलानस्थळी पोलिसांनी लाठीमार केला व त्यातून हे प्रकरण राज्यभर पेटत गेले. या लाठीमाराचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले होते हे त्यांनीच नंतर सांगितले.
आरक्षण प्रश्नावर जातनिहाय जनगणना हाच पर्याय आहे पण मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात जातनिहाय जनगणनेचा साधा उल्लेखही केला नाही. राज्यात दोन्ही समाजात वाद नको. मराठा-ओबीसी समाजात पेटवलेला वणवा आता थांबला पाहिजे, हा वाद समाप्त करण्यासाठी सर्वांनी काम करून सामाजिक ऐक्य जपले पाहिजे, असे आवाहन पटोले यांनी केले.
कायदा सुव्यवस्थेवरील विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरु असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कोणीही वरिष्ठ मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने नाना पटोले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली व ही गंभीर बाब आहे असे म्हटले.