आकोट- संजय आठवले
हरीण व डुकरे यांचे हल्ल्यापासून आपल्या पिकाच्या सुरक्षेकरिता रात्रीत शेत रखवाली करणाऱ्या शेतकऱ्यांना विद्रुपा नदीच्या रुद्रावताराचा सामना करावा लागला असून त्यातील १२ जणांना वाचविण्यात यश आले आहे. तर वाहून जाणाऱ्या मामा भाचा यांच्यातील भाचा सापडला असून मामाचा शोध अद्यापही सुरू आहे. गावकऱ्यांचे मदतीने प्रशासन बचाव कार्यात प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. मात्र शेत रखवाली करणाऱ्या या शेतकऱ्यांना मृत्यूशी झुंज घेण्यास हरीण व डुकरे कारणीभूत ठरत असल्याने प्रशासनाने या नैसर्गिक आपत्तीची दखल घेऊन हरणे व डुकरे यांचे पासून शेतकऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी, अटकळी, मनब्दा, टाकळी या शिवारात डुकरे व हरिणांनी एकच उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या अंधाराचा लाभ घेऊन ही जनावरे अख्या शेताचा फडशा पाडीत आहेत. ही जनावरे झुंडीने येतात. त्यामुळे एकटा दुकटा माणूस त्यांच्यावर नियंत्रण करू शकत नाही. त्याकरिता मदतीला किमान एक सोबती तरी हवाच हवा. त्यामुळे या शिवारातील शेतकऱ्यांना पाऊस वाऱ्याची पर्वा न करता रात्रीचे वेळी रखवालीकरिता शेतात मुक्कामी जावेच लागते.
अशा अगतिकतेमुळे २१ जुलै रोजी अनेक शेतकरी आपल्या शेतात रखवालीकरिता मुक्काम ठोकून होते. अमोल कुकडे, कृष्णा ठाकूर, गोमाजी वरणकार, भास्कर राऊत, गोविंद ठाकूर, नितीन देठे, राजू देठे, केशव भारसाखळे, सुमेध सरदार, चंदू तायडे, राहुल तायडे, विजय इंगळे हे आपापल्या शेतात रखवाली करीत होते. त्यांचे सोबतच अंकित संग्राम सिंग बनाफर वय ३२ वर्षे व त्याचा भाचा बाला दिनेश सिंह चव्हाण वय १६ वर्षे, हे दोघेही आपले शेतात ट्रॅक्टर ट्रॉलीवर छत तयार करून त्यात पहूडले होते. जोराचा पाऊस कोसळत होता.
अशातच शेताशेजारील विद्रूपा नदीने अचानक रूद्रावतार धारण केला. अचानक पुराचे पाणी वाढले. डोळ्याचे पाते लवते न् लवते तोच हा संपूर्ण परिसर जलमय झाला. ज्यांना जाग आली ते लोक चटकन सुरक्षित ठिकाणी गेले. परंतु अंकित व बाला हे ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये झोपेत होते. त्याच अवस्थेत त्यांचेसह ट्राॅली वाहून जावू लागली. या घटनेची खबर मिळताच मुन्ना पाथ्रिकर या तडफदार तरुणाने तेल्हारा तहसीलदार संतोष यावलीकर यांना पहाटे ४ वाजता परिस्थितीचे गांभीर्य सांगितले. त्यावर क्षणाचाही विलंब न लावता यावलीकर यांनी एनडीआरएफ अकोला टीमला त्वरित पाचारण केले. हे होत असतानाच नायब तहसीलदार विकास राणे, तलाठी संतोष रसाळे, कोतवाल संदीप राऊत हे एका तासात घटनास्थळी पोचले.
सकाळी ८ वाजता एनडीआरएफ ची टीम सुद्धा घटनास्थळी पोचली. या टीमने लगेच बचाव कार्यास प्रारंभ केला. एका तासाच्या अथक प्रयासानंतर सर्वच शेतकऱ्यांना धोक्यातून बाहेर काढण्यात यश प्राप्त झाले. मात्र अंकित व बाला हे वाहून गेले. त्यांचा सर्वत्र शोध सुरू झाला. बचाव पथकाला या बचाव कार्यात व शोध कार्यात गावातील धाडसी युवक मुन्ना पाथ्रिकर, प्रशांत साबळे, डॉक्टर माधवराव पाथ्रिकर, पोलीस पाटील टाकळी, दिनेश पाथ्रिकर टाकळी, अंकित कुकडे, प्रवीण कुकडे, वैभव कुकडे, उपसरपंच गौरव कुकडे यांनी मोलाचे सहकार्य केले. हा शोध सुरू असतानाच बाला हा पंचगव्हाण येथे सापडला असल्याचे वृत्त आले. त्याने सांगितले कि, “आम्ही ट्रॉलीसह वाहून जात असताना माझे मामा अंकितने ट्रॉली बाहेर उडी घेतली. उडी घेताच तो पाण्याच्या प्रवाहात दिसेनासा झाला. परंतु मी ट्रॉलीत बसून होतो. पाण्याच्या धारेत ट्रॉली पलटी खात पंचगव्हाण पर्यंत आली.” यानंतर बाला याला उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले आहे. परंतु अंकितचा अद्यापही पत्ता न लागल्याने त्याचा शोध सुरूच आहे.
या घटनेबाबत गावकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यासोबतच वन विभागाबाबत अत्यंत तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतशिवारात डुकरे व हरिण आले नसते तर अशी जीवघेणी घटना घडलीच नसती. वनविभाग यावर कोणतीच उपाययोजना करीत नाही. शेतकरी मेले तरी हरकत नाही. मात्र डुकरे व हरिणांना त्रास होता कामा नये, अशी वनविभागाची रीत आहे. वन अधिकारी स्वतः डुकरे व हरिणांचा बंदोबस्त करीत नाहीत. शेतकरी करू ईच्छितात तर त्यांचेवर गुन्हे दाखल केले जातात. त्यामुळे हरीण व डुकरांना उभे पीक खाऊ द्यावे कि त्यांना हूसकावून लावण्याकरिता जीवाला मुकावे? असा सवाल शेतकरी विचारीत आहेत. या निमित्ताने प्रशासनाने हरीण व डुकरांची गंभीर समस्या प्राधान्याने सोडविण्याची निकड निर्माण झाली आहे.