ठाणेदार शेतकऱ्यांच्या तक्रारी घेत नसल्यामुळे ‘स्वाभिमानी’चे पोलीस अधीक्षकांना निवेदन…
मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड
वाशिम : रिसोड पोलीस स्टेशन हद्दीतील एकलासपूर, पाचंबा, घोटा शेतशिवारात कृषी साहित्य चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. परिणामी, रिसोड तालुक्यातील शेतकरी वर्ग धास्तावला असून, रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेतकऱ्यांच्या तक्रारी घेण्यास नकार देत आहेत.
ही बाब पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे रिसोड पोलीस स्टेशन ठाणेदारांना शेतकऱ्यांच्या तक्रारी घेऊन, चोरट्यांचा तपास करीत गुन्हे दाखल करण्याबाबत आदेशीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाचंबा, एकलासपूर शेतशिवारातून गत काही दिवसांपूर्वी स्प्रिंकल तोट्या, पाईप, केबल व इतर कृषी साहित्य चोरीस गेल्याच्या घटना घडल्या.
एकलासपूर येथील ९, पाचंबा येथील ४ शेतकऱ्यांच्या शेतातून स्प्रिंकलर तोट्या व इतर साहित्य तर घोटा (ता. रिसोड) शेत शिवारातील ४ शेतकऱ्यांच्या शेतातून सोलर पॅनलला बसविलेले केबल व इतर महागडे साहित्य चोरीस गेले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे प्राप्त झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हा पोलीस अदीक्षकांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना शेतकऱ्यांच्या चोरीस गेलेल्या कृषी साहित्याच्या तक्रारी नोंदवून घेत, तातडीने तपास करून चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत आदेशीत करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा शेतकरी हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष बालाजी मोरे, युवा जिल्हाध्यक्ष सतीश पाटील इढोळे, विदर्भ सचिव राम पाटील इढोळे यांनी दिला आहे.
रिसोड पोलीसांच्या कार्यवाहीबाबत शंका?
गेल्या काही दिवसांत रिसोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरट्यांनी हैदोस मांडला आहे. या चोरट्यांवर अंकुश लावण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्यामुळे की काय, रिसोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यास गेलेल्या शेतकऱ्यांची तक्रार सुद्धा नोंदवून घेण्यात येत नाही. त्यामुळे रिसोड पोलीस स्टेशनच्या कार्यवाहीबाबत शेतकऱ्यांमधून शंका उपस्थित केल्या जात आहे.