शहरातील मोकाट गुरे कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करावा.- श्रीकांत देशपांडे
आकोट – संजय आठवले
सद्यस्थितीत मुले पळविणाऱ्या टोळीबाबत अनेक कहाण्या प्रसृत होत आहेत. परंतु अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण याबाबतीत अकोला पोलीस विभाग सतर्क असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आकोट येथे संपन्न झालेल्या शांतता समितीच्या सभेत प्रतिपादन केले. याचवेळी उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी शहरात बेसुमार वाढलेला कचरा आणि मोकाट गुरे व कुत्रे यांच्यावर करावयाचा इलाज सांगून त्यावर अमल करण्याचे पालिका मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिले.
आगामी काळात होणारा दुर्गोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि ईद या तिन महत्त्वपूर्ण सणांच्या पार्श्वभूमीवर आकोट शहर पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा संपन्न झाली. या सभेत उपस्थिताना संबोधित करताना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सर्व नागरिकांना शांततेचे आवाहन केले.
अनुचित कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहेच तथापि नागरिकांना अशा असामाजिक कारवायांची माहिती मिळाल्यास ती पोलिसांपर्यंत पोहोचविण्याचेही त्यांनी आवाहन केले. यासोबतच मुले पळविणाऱ्या टोळीबाबत नागरिकांनी काळजी करू नये, कारण याबाबत अकोला पोलीस विभागाने योग्य ती काळजी घेतली असल्याचे सांगून त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आश्वस्त केले.
ह्याच वेळी आकोट उपविभागीय अधिकारी तथा आकोट पालिका प्रशासक श्रीकांत देशपांडे यांनी शहरातील बेसुमार वाढलेला कचरा आणि मोकाट फिरणारी गुरे व कुत्रे यांचे बाबत चिंता व्यक्त केली. सोबतच याबाबत करावयाच्या उपाय योजनांची माहिती देऊन त्याबाबत पाऊले उचलण्याची सूचना सभेत उपस्थित पालिका मुख्याधिकारी यांना केली.
शहरात शांततेत पार पडलेल्या गणेशोत्सवाबाबत त्यांनी आनंद व्यक्त करून अशाच शांतीपूर्ण वातावरणात दुर्गोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन व ईद हे सण साजरे करण्याचेही त्यांनी नागरिकांना आवाहन केले. गणेशोत्सवाचे दरम्यान आणि गणेश विसर्जन शोभायात्रेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडळांकरिता गजानन महाराज संस्थान तर्फे बक्षिसे जाहीर करण्यात आली होती.
या याकरिता संजय आठवले, मंगेश लोणकर, चंचल पितांबर वाले, संजय शर्मा व वसीम खान यांनी गुणांकन केले.संस्थानचे अध्यक्ष अॅड. गांधी व सचिव पुरुषोत्तम चौखंडे यांनी यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्या बक्षिसांचे वितरण केले. प्रथम बक्षीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरसिंग मंदिर, द्वितीय बक्षीस आकोट चा राजा जयस्तंभ चौक, आणि तिसरे बक्षीस वैदू गणेशोत्सव मंडळ राजेंद्र नगर यांना देण्यात आले.
त्यानंतर दुर्गा माता संस्थान कबुतरी मैदान यांच्यातर्फे पोलीस अधीक्षक जी श्रीधर, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर, ठाणेदार प्रकाश अहिरे, पोउनि रणजीत खेळकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे,
उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर,अॅड. ब्रिज मोहन गांधी, सुरेश अग्रवाल, संजय आठवले यांनी सभेला संबोधित केले. प्रास्ताविक शहर पोलीस ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी तर आभार प्रदर्शन आकोट ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार नितीन देशमुख यांनी तर सूत्रसंचालन प्रकाश गायकी यांनी केले.