संविधान चौक येथे झालेल्या विशाल रैलीत कर्मचारी संघटनांचा निर्धार.
नागपूर – शरद नागदेवे
नागपूर :- जुनी पेन्शन योजना लागू झाल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही असा निर्धार कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान चौक येथे झालेल्या विशाल रैलीमध्ये व्यक्त केला आहे. शनिवार सकाळी ११.३० वाजता यशवंत स्टेडियम येथून भव्य रैलीला सुरुवात झाली. हातात संघटनेचे बॅनर व “एकच मिशन जुनी पेन्शन” चे फलक घेऊन संविधान चौककडे मोर्चाद्वारे रैली रवाना झाली. वाटेत “एकच मिशन जुनी पेन्शन” चे जोरदार घोषणाबाजी व नारे लावण्यात आले.
झीरो माईल मेट्रो स्टेशन जवळ मोर्चा पोहोचला तेव्हा मोर्चाचे टोक व्हेरायटी चौक येथे होते. यावेळी झीरो माईल चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. तब्बल दोन तास वाहतुकीची कोंडी सुरू होती. मात्र वाहतूक पोलिसांनी ही कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. दुपारी ०१.३० वाजता संविधान चौक येथे मोर्चाद्वारे रैली पोहोचली. यावेळी या ठिकाणी प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले.
मंचावर शिक्षक आमदार सुधाकर आडबले, माजी आमदार नागो गाणार, महाराष्ट्र जुनी पेन्शन योजनाचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, उत्तराखंड येथील आलेले अखिल भारतीय जुनी पेन्शन योजनेचे अध्यक्ष वी.पी.सिंग रावत, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अशोक दगडे, केंद्रीय कर्मचारी जेसीटीयु संघटनेच्या सरचिटणीस गुरप्रितसिंग, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ सोहन चवरे, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे गोपीचंद कातूरे, महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे (ओंकार प्रणित) जिल्हाध्यक्ष अरविंद अंतुरकर,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस संजय तांबडे, ज्ञानेश्वर महल्ले, बुधाजी सुरकार, अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका संघटनेच्या संगीता चंद्रिकापुरे, रंजना कांबळे आदी उपस्थित होते.
आ. सुधाकर आडबले यांनी आमदार पदाची शपथ घेतानाच “एकच मिशन जुनी पेन्शन”चा गळ्यात दुपट्टा व डोक्यात टोपी घालूनच शपथ घेतली असून या आंदोलनात आता माघार घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.माजी आमदार नागो गाणार यांनी काही विघ्नसंतोषी लोक हेतुपुरस्सर प्रतिकूल बातम्या पसरवून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असून हे षडयंत्र हाणून पाडण्याचे आवाहन केले.जुनी पेन्शन योजनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी जुनी पेन्शन योजनेचा किती अभ्यास करणार ? अभ्यास समितीच्या नावाखाली टाईमपास सुरु आहे.
ज्या बक्षी समितीने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीत कर्मचाऱ्यांवर अन्याय केला त्यांची पुन्हा नेमणूक करून कर्मचाऱ्यांची एक प्रकारची थट्टा केली असल्याचा आरोप करून जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांनी कर्मचाऱ्यांनी जवळपास १७ मागण्या असताना “एकच मिशन जुनी पेन्शन” या एकाच मागणीला प्राधान्य देण्यात आले असून या मागणीनिमित्त जी एकजुटता दाखविली ती अभूतपूर्व असून ती मागणी पूर्ण होईपर्यंत कायम ठेवण्याचे आवाहन केले.
कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ सोहन चवरे यांनी सांगितले की, या मोर्चात ५० हजार कर्मचारी सहभागी होणार असल्याचा आम्ही दावा केला होता प्रत्यक्षात या क्रांतिकारी संविधान चौकात पाय ठेवायलाही जागा नाही, शासकीय ग्रंथागार पर्यंत जनसागर उसळला आहे. जे सरकार आमची मागणी मान्य करेल तेच आमचे सरकार राहील. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले असून ही एकता जुनी पेन्शनची मागणी तडीस जाईपर्यंत कायम ठेवण्याचे आश्वासन दिले.
सोबतच सोमवार २० मार्च रोजी गगनभेदी थाळी नादाचे आंदोलन यशस्वी करून थाळी नादचा गजर मुंबई व दिल्लीच्या सिंहासनाला हादरा बसविणारा असला पाहिजे असे आवाहन केले. या विशाल रैलीचे सूत्र संचालन जुनी पेन्शन योजनेचे राज्य उपाध्यक्ष आशुतोष चौधरी यांनी केले. तर महारष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस संजय तांबडे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने रैलीचा समारोप झाला.