सत्तेच्या जोरावर तोडफोडीचे राजकारण, भाजपाचेही अनेकजण काँग्रेसच्या संपर्कात, एकच हातोडा मारु.
नागपूर – जागावाटपावरून महाविकास आघाडीत कसलेही मतभेद वा गोंधळ नसून गोंधळ हा महायुतीत आहे, त्यांच्यात काहीच ताळमेळ नाही. मविआतील सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरु असून बहुतांश जागा निश्चित झाल्या आहेत, लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.
भाजपाला सत्तेतून हद्दपार करणे हाच महाविकास आघाडीचा मुख्य उद्देश आहे आणि आम्ही महायुतीचा मोठा पराभव करु, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महायुतीचे वातावरण राज्यात कुठेच नाही ते फक्त जाहिरातीतच दिसत आहे,
जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरु आहे परंतु जनभावना मात्र वेगळ्या आहेत. निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपा व त्यांच्या मित्रपक्षांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बारामतीच्या जागेवरही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येणार आहे.
भाजपा व त्यांचे मित्रपक्ष मीडियातून वातावरण निर्मिती करत आहेत प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. अजित पवार यांनी बारामतीत बिर्याणीचा कार्यक्रम ठेवला होता परंतु ते शरद पवारांविरोधात बोलायला लागले की लोक निघून गेले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी हे चिन्ह मिळाले आहे,
एका हातात मशाल व दुसऱ्या हातात तुतारी हा भाजपाच्या तानाशाहीला संदेश आहे. या तुतारीत अत्याचारी व्यवस्थेला संपवण्याची क्षमता आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म दिला परंतु या अत्याचारी व्यवस्थेने त्यांचा पक्ष व घड्याळ चिन्हही चोरून घेतले.
काँग्रेसमधून काही लोक बाहेर जात आहेत या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, सत्तेच्या जोरावर त्यांना जेवढे घ्यायचे आहेत तेवढे घेऊ द्या, त्यांच्या पक्षातील कितीजण आमच्या संपर्कात आहेत याची त्यांना कल्पना नाही. सत्तेच्या जोरावर जेवढा खेळ खेळायचा तेवढा त्यांना खेळू द्या, आम्ही एकच हातोडा मारू मग त्यांना कळेल, असेही नाना पटोले म्हणाले.