सांगली – ज्योती मोरे
मिरज शहरातील वाहतुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता महत्वाचा आहे. या रस्त्याच्या कामाला संबंधित सर्व यंत्रणानी गती द्यावी. कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नये. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.
मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ते कामाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, महानगरपालिकेचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, विद्युत अभियंता अमर चव्हाण, नगर आणि शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, महावितरण, परिवहन विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी विजेचे खांबांचे स्थलांतर, एस. टी. महामंडळाकडील रस्त्यालगतची भिंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची भिंतीबाबतचे काम, मालकी हक्काच्या जागांसाठी मोबदला आदिंबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने व सहकार्याने गतीने कार्यवाही करावी. या रस्त्याचे काम त्वरेने पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महानगरपालिका, महावितरण, राज्य परिवहन विभाग यासह संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने व सहकार्याने कार्यवाही करावी. रस्त्याच्या मधोमध फुलझाडे लावावीत. दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर लावावेत, असे त्यांनी यावेळी सूचित केले.