Friday, November 22, 2024
Homeराज्यशहरातील विविध वार्डातील पाण्याची समस्या लागणार मार्गी - दामोधर धोपटे यांच्या अथक...

शहरातील विविध वार्डातील पाण्याची समस्या लागणार मार्गी – दामोधर धोपटे यांच्या अथक प्रयत्नांचे फलीत…

नागरीकांनी मानले धोपटेंचे आभार

रामटेक – राजु कापसे

शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड, सुभाष वार्ड, टिळक वार्ड, छोरीया लेआउट, मुरमुरा भट्टी परिसर यांचे सहित विनोबा भावे वार्ड, शिवाजी वार्ड व आझाद वार्ड या परिसरात मागील अनेक दशकांपासून पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई नागरिकांना भेडसावत होती. तेव्हा परिस्थितीचे गांभिर्य ओळखून माजी नगरसेवक तथा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दामोधर धोपटे यांनी सदर समस्या मार्गी लागण्याच्या दृष्टीकोनातुन आपले अथक प्रयत्न चालविले. परिणामस्वरूप ही समस्या मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

सुजल निर्मल पाणीपुरवठा योजना व वाढीव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होऊनही सदर भागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झालेली नसल्याचे चित्र बघून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड व विनोबा भावे वार्ड येथील टाकीजवळ संप व पंप यंत्रणा स्थापित करण्याबाबतची मागणी आ.श्री सुनीलबाबू केदार, माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी श्री राजेंद्र मुळक यांच्या कुशल मार्गदर्शनात रामटेक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री दामोधर धोपटे अध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

याबाबतचा नगरपालिका प्रशासनाशी अखंडितपणे पाठपुरावा करण्यात आला वेळप्रसंगी आंदोलनात्मक भूमिका सुद्धा घेण्यात आली. दि.०५ डिसेंबरला नगरपालिका कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने श्री राजेंद्र मुळक यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर धरणे सुद्धा आंदोलन करण्यात आले. दि. १६ डिसेंबरला नगरपरीषद प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्या दालनात मुख्याधिकारी नगरपरिषद रामटेक यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीत अतिशय समाधानाकारक चर्चा होऊन , तडका फडकी निर्णय घेण्यात आले. त्या अनुषंगाने अवघ्या काही तासातच छोरीया लेआउट व मुरमुरा भट्टी (टिळक वार्ड) परिसरातील नागरिकांची वर्ष 2005 पासून प्रलंबित व दुर्लक्षित असलेली मागणी मंजूर होऊन, पाणीपुरवठ्याचे दर रु.३१० पासून सुटका होऊन, सर्वांना प्रचलित पद्धतीने रु.१४० ची देयके पाठविण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथील संप स्थळी दि.१९ डिसेंबरला थ्री फेज विद्युत कनेक्शन जोडणी करण्यात आली.

यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड, सुभाष वार्ड, टिळक वार्ड, छोरीया लेआउट व मुरमुरा भट्टी परिसरातील नागरिकांची मागील अनेक दशकांपासून भेडसावत असलेली पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई दूर होणार आहे. त्याचप्रमाणे २१ डिसेंबरला विनोबा भावे वार्ड येथील संप स्थळी थ्री फेज विद्युत मिटर कनेक्शन जोडणी तातडीने करण्यासंदर्भात कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली होती.

दरम्यान थ्री फेज विद्युत मीटर कनेक्शन चे अंदाजपत्रक तयार असून, त्याबाबतची डिमांड नगरपालिका प्रशासनास तातडीने पोहोचती करण्याचे तसेच सदर डिमांड ची देयके तातडीने पुरविण्यासंदर्भात आवश्यक तो पाठपुरावा कमेटीच्या वतीने करण्यात येणार असल्याचे यावेळी दामोधर धोपटे यांनी माहीती देतांना सांगतले. अल्पावधीतच विनोबा भावे वार्ड येथील संप स्थळी थ्री फेज विद्युत मीटर कनेक्शन जोडणी होऊन त्यामुळे विनोबा भावे वार्ड, आझाद वार्ड व शिवाजी वार्ड परिसरातील नागरिकांची मागील अनेक दशकांपासून भेडसावत असलेली पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई दूर होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: