आकोट- संजय आठवले
आकोट तालुक्यातील चिंचखेड खुर्द येथील निसर्गप्रेमी गावकऱ्यांनी २,२०० झाडांचा वाढदिवस साजरा केला असून त्याकरिता चक्क शेणखता द्वारे बनविलेला केक कापून तो मोठ्या भक्ती भावाने वृक्षांना भरविला. गावकऱ्यांच्या या निसर्ग प्रेमाचे पंचक्रोशीत स्वागत तथा कौतुक होत आहे.
ग्राम लोहारी तथा चिंचखेड खुर्द या एकमेकांना खेटून असणाऱ्या गावातील ग्रामस्थ वृक्ष प्रेमात ओतप्रोत असल्याने चिंचखेड खुर्द येथील गावकऱ्यांनी दोन गावांच्या सीमेलगतच्या पडीत जमिनीवर अतिशय सुंदर बाग तयार केला आहे. त्याकरिता गावकऱ्यांनी एकाच दिवशी २२०० झाडे लावली होती. त्यांचे संगोपन विश्वशांती बुद्ध विहार ट्रस्ट करीत आहे. त्यांना आत्मियता कल्याण मित्र संघाचे ही पूर्ण सहकार्य आहे. दिनांक ४ जुलै रोजी गावकऱ्यांनी या झाडांचा वाढदिवस साजरा केला.
गावातील बालके, युवक, महिला व कर्त्या पुरुषांनी या सोहळ्यात अत्यंत हर्षाने सहभाग घेतला. वृक्षांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गावकऱ्यांनी खपून शेणखताचा भला मोठा केक तयार केला. हॅपी बर्थडे च्या गजरात हा केक कापण्यात आला. आणि मोठ्या आत्मियतेने हा केक प्रत्येक वृक्षाच्या पायथ्याशी अर्पण केला.
या आगळ्यावेगळ्या सोहळ्याकरिता तंटा मुक्ती अध्यक्ष बाबाराव डिक्कर, शुभम म्हैसने, धनराज सपकाळ, वृक्षमित्र शरद गावंडे, कैलास सपकाळ, बाबन वानखडे, अजय सपकाळ, सुखदेव डीक्कर, अशोक वानखडे, सुरेश सपकाळ, जगदेवराव वानखडे, सिद्धार्थ सपकाळ, माणिक बोदडे, नाजुकराव वानखडे, नागसेन सपकाळ, भिमराव सपकाळ, धम्मपाल सपकाळ, बुद्धप्रकाश सपकाळ, नितीन बोदडे व आत्मीयता कल्याण मित्र मंडळाचे सर्व सदस्य तसेच देशाचा आधार स्तंभ असलेली बालके, किशोर, युवक व नेहमी निंदण खुर्पन करुन बागेच्या संगोपनात मोलाचे योगदान देणाऱ्या सुजाता महिला मंडळाच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.