नरखेड – अतुल दंढारे
नरखेड तालुक्यातील मन्नाथ(खेडी)शिवारात आज सकाळी पहाटे चार वाजताच्या सुमारास एका शेतकर्याच्या शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या वासरांची हिंस्र पशुने शिकार केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.याबाबत वनविभागाला कळविले असून नेमका वाघ आहे की बिबट्या की अन्य हिंस्र पशु याबाबत वनविभाग आज ट्रॅप कॅमेरे लाऊन त्याचा शोध घेणार आहे.
माहितीनुसार (दि 20) पहाटे चार वाजताच्या सुमारास मन्नाथ(खेडी) येथील शेतकरी युवराज मडके यांचे शेतातील तीन वासरांची शिकार हिंस्र पशुने केल्याची धक्कादायक घटना घडली.मडके यांचे शेत जंगलापासून हाकेच्या अंतरावर आहे.मन्नाथखेडी शिवारात झालेल्या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून ताबडतोब वनविभागाने या हिंस्र पशुचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मात्र शिकार करणारा वाघ की बिबट्या आहे याबाबत शेतकरी आणि वनविभाग यांच्यात मतभेद आहे.
चार दिवसा(तारीख 16)आधीच सदर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जुनापाणी शिवारात एका वाघाचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता.हा वाघ त्याचा जोडीदार असावा असा अंदाज शेतकऱ्यांमधून वर्तवण्यात येत आहे.गेल्या अनेक दिवसांपासून या जंगल भागात वाघ असल्याची खात्रीलायक माहिती शेतकर्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे मात्र त्यांनी याकडे लक्ष दिले नसल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
अनेक शेतकर्यांच्या शेतातील गोठ्यात बांधून ठेवलेले पाळीव पशु वाघांनी शिकार करून फस्त केले.त्याबाबत अनेकदा कळविले मात्र त्याकडे अधिकार्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे अनेक शेतकर्यांचे नुकसान झाले. शेतकरी वाघ सांगत असले तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघ नसून हा बिबटय़ा वाघ असल्याचे सांगितले आहे.
शेतकर्याच्या शिकार केलेल्या तिन्ही वासरांचा पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडून पंचनामा केला असून सदर शेतकर्याला शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात येईल.शिकार करणारा जंगली पशु हा बिबट्या आहे तरी खात्री करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले असून त्यावर पाळत ठेवण्यात येणार आहे. डी.एन.बल्की, वनपरिक्षेत्र अधिकारी, नरखेड
चार दिवसापूर्वी जवळच असलेल्या जुनापाणी शिवारात एका वाघाचा विहिरीत पडून मृत्यू झाला.त्याचा जोडीदार असावा असा अंदाज आहे.वनविभागाने तातडीने शेतकर्याला नुकसानभरपाई द्यावी तसेच या वाघाचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. अनिल बांदरे, सरपंच मन्नाथ(खेडी)