कोल्हापूर – राजेंद्र ढाले
दिवसाढवळ्या मेंढपाळांच्या डालग्यातील 70 हजार रुपये किमतीची मेंढ्यांची बारा पिल्ली अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील महात काट्यासमोर असलेल्या मोकळ्या मैदानात झाली. याबाबतची फिर्याद करसिद्ध नारायण पुजारी (रा. माळवाडी गडमुडशिंगी ता.करवीर) यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.
गडमुडशिंगी येथील मेंढपाळ करसिद्ध पुजारी, भगवान सजन रेवडे, नितीन बाळू बनकर यांची बकरी दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे माळरानावर बसण्यास होती. सकाळी दहाच्या सुमारास मेंढपाळांनी आपापल्या मेंढ्यांची लहान पिल्ले डालग्यात घालून मेंढ्यांना चरावयास दुर नेले होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मेंढ्या चारवुन मेंढपाळ पिल्ली असणाऱ्या ठिकाणी आले. पण त्यांना पिल्ली डालग्यामध्ये नसल्याचे लक्षात आले.
दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यांनी डालग्यातून करसिद्ध पुजारी यांची सहा, भगवान रेवडे यांची तीन, आणि नितीन बाळू बनकर यांची 5 अशी एकूण 70 हजारांची बारा पिल्ली लंपास केली. दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे मेंढपाळात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात चोरट्यांवर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते कृष्णात रेवडे हे भर पावसात मेंढपाळाच्या मदतीला धावून जात त्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण मदत केली.