आकोट – संजय आठवले
प्रहार संघटनेचा नेता तुषार पुंडकर याचे हत्या प्रकरणात साक्षी पुराव्यांची तपासणी सुरू झाली असून एका पोलीस कॉन्स्टेबलची साक्ष पूर्ण झाली आहे. तर दुसऱ्या साक्षीदाराची साक्ष आज अपूर्ण राहिली असल्याने दि. १७ डिसेंबर रोजी उर्वरित साक्ष घेण्यात येणार आहे. सरकार पक्षातर्फे एकूण २७ साक्षीदारांची यादी न्यायासनासमोर सादर करण्यात आली असून माहे जून २०२५ पर्यंत सदर खटला निकाली काढण्याचे आदेश नागपूर उच्च न्यायालयाने दिल्याने त्या दृष्टीने खटल्याचे कामकाजास सुरुवात झालेली आहे.
या प्रकरणात फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल भास्कर सांगळे यांनी फिर्याद दाखल केलेली आहे. त्यावरून आरोपी क्र. १ पवन सेदाणी, क्र. २ अल्पेश दुधे, क्र.३ श्याम नाठे, क्र.४ गुंजन चिंचोळे सर्व राहणार आकोट. तर मध्य प्रदेशातील इंदोर येथे राहाणारा आरोपी क्र.५ निखिल सेदाणी, क्र. ६ शुभम जाट राह. फिफरिया जिल्हा खरगोन, क्र.७ शाहाबाज खान राह. शेंदवा जिल्हा बडवानी यांचेवर तुषार पुंडकर ह्याची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला.
या सर्व आरोपींनी कट कारस्थान करून दि.२१/२/२०२० रोजी रात्री दहा वाजताचे सुमारास तुषार वर गावठी पिस्तुलाने गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला असे फिर्यादीत म्हटले गेले आहे.
या फिर्यादीचे अनुषंगाने वरील सर्व आरोपींविरुद्ध पोलीस तपास करण्यात आला. त्यानंतर या सर्व आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. यातील आरोपी क्र.३ श्याम नाठे राहणार आकोट हा अद्यापही अकोला कारागृहात बंदिस्त आहे.
या प्रकरणातील गंभीरता ध्यानात घेऊन नागपूर उच्च न्यायालयाने हा खटला माहे जून २०२५ पर्यंत निकाली काढण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालय आकोट यांना दिले आहेत. त्याकरिता विशेष सरकारी वकिल ॲड. विनोद फाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे मार्गदर्शनाखाली सरकारी वकील ॲड. अजित देशमुख यांनी सरकारतर्फे एकूण २७ साक्षीदारांची यादी आकोट न्यायालयात सादर केली आहे.
त्यानुसार खटल्याची सुनावणी सुरू झाल्यावर प्रकरणातील फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल भास्कर सांगळे यांची प्रथम साक्ष दि.१३ नोव्हेंबर २०२४ रोजी नोंदविण्यात आली.
त्यानंतर विशेष सरकारी वकील ॲड. विनोद फाटे यांचे तर्फे सरकारी वकील ॲड. अजित देशमुख यांनी घटनास्थळ पंच म्हणून दिनेश प्रल्हादराव मोहोकार आणि शैलेश विजयराव मेतकर यांचे नावे साक्ष समन्स जारी करण्याची न्यायालयास विनंती केली.
त्यानुसार या दोन्ही घटनास्थळ पंचांना दि. ९/१२/२०२४ रोजी साक्षी करिता हजर राहण्याचे आदेश दिले गेले. त्यावर ठरल्याप्रमाणे आज घटनास्थळ पंच म्हणून शैलेश मेतकर यांची साक्ष सुरू झाली असून त्यांची उर्वरित साक्ष दि.१७/१२/२०२४ रोजी घेण्यात येणार आहे.
ही साक्ष नोंदविण्याचे वेळी विशेष सरकारी वकील ॲड.विनोद फाटे, आरोपीचे वकील ॲड.सत्यनारायण जोशी, ॲड. दीपक कुटे, ॲड. राहुल वानखडे हे उपस्थित होते. हा खटला अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एम. पाटील यांचे न्यायालयात सुरु आहे.