आकोट – संजय आठवले
राज्य शासनाने गेल्या १२ जून रोजी ६० महसुली अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्यांमध्ये बदलीचे ठिकाणी रुजू झालेल्या महिला तहसीलदाराची चारच दिवसात पुन्हा बदली झाल्याने त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली. त्यामुळे आर्थिक व्यवहार होऊन या बदल्या करण्यात आल्याची तक्रार विरोधी पक्षाने केल्याने, मॅटने ह्या ६० ही बदल्यांवर स्थगिती दिली आहे. परिणामी आकोट येथून बदलून गेलेले तहसीलदार निलेश मडके यांची पुन्हा आकोट वापसी होणार असल्याची चर्चा होत आहे.
गेल्या १२ जून रोजी राज्य शासनाने ६० महसुली अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये शारदा दळवी यांची रँक नुसार बसमत येथे बदली झाली होती. शासकीय आदेशानुसार या लोकांना १५ जून पूर्वी आपले बदलीचे ठिकाणी रुजू होण्यास फर्मावले गेले होते. त्यानुसार शारदा दळवी ह्या वसमत येथे रुजू झाल्या.
परंतु त्यानंतर चारच दिवसात वरिष्ठ स्तरावर हालचाली होऊन शारदा दळवी यांचे ठिकाणी सुजित नरहरे यांची पदस्थापना केल्याचे आदेश प्राप्त झाले. विशेष म्हणजे दळवी यांना अन्यत्र कुठेही पोस्टिंग देण्यात आलेली नाही. त्यामुळे शासन दरबारी या बदल्यांमध्ये गडबड घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले.
या अन्यायाविरोधात शारदा दळवी यांनी मॅटमध्ये धाव घेतली. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार दाखल केली. त्यावर मॅटने या ६० ही बदल्यांना स्थगिती दिली आहे. १२ जूनच्या याच बदल्यांच्या यादीमध्ये ‘विनंतीवरून बदली’ या सदराखाली आकोटचे तहसीलदार निलेश मडके आणि आकोट येथे येऊ घातलेले तहसीलदार सुनील चव्हाण यांचीही नावे आहेत.
त्यानुसार निलेश मडके यांची बदली तहसीलदार मेहकर जिल्हा बुलढाणा म्हणून झालेली आहे. गत १५ जूनला त्यांनी तेथील पदभारही ग्रहण केलेला आहे. २२ जून रोजी त्यांनी सामानासहित आपला कुटुंब कबिलाही बदलीचे ठिकाणी हलविला आहे. अशातच या बदल्यांना मॅटने स्थगिती दिल्याचे वृत्त येऊन धडकले आहे.
त्यातच आकोट येथे येणारे तहसीलदार सुनील चव्हाण यांनी १५ जून पर्यंत बदलीचे ठिकाणी रुजू होण्याचे आदेश असल्यावरही अध्यापपर्यंत आकोट येथे येण्याचे टाळले आहे. या सर्व घटनाक्रमामुळे १२ जून पूर्वीची स्थिती बहाल होण्याची संभावना बळवली आहे. त्यामुळे तहसीलदार निलेश मडके यांची आकोट वापसी होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.