Friday, November 22, 2024
Homeराज्यलंपी त्वचारोगाचे निर्मूलनार्थ पशुसंवर्धन विभाग ॲक्शन मोडवर, राज्य पशुसंवर्धन आयुक्तांनी घेतला आकोटचा...

लंपी त्वचारोगाचे निर्मूलनार्थ पशुसंवर्धन विभाग ॲक्शन मोडवर, राज्य पशुसंवर्धन आयुक्तांनी घेतला आकोटचा आढावा…

पशुपालकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन…

आकोट – संजय आठवले

जनावरांना होणाऱ्या लंपी त्वचा रोगाने आकोट तालुक्यात शिरगाव केला असून त्या संदर्भातील कामाचा आढावा घेण्यासाठी राज्य पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी आकोटला भेट दिली. तालुक्यात आतापर्यंत ७१९३ गुरांचे लसीकरण करण्यात आले असून २७४ गोठ्यांची फवारणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी घाबरून न जाता योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

लम्पी त्वचा रोग हा गोवंश आणि म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणू हे देवी विषाणू गटातील कॅप्रीप्लॉक्स (CapriPlox) या प्रवर्गात मोडतात. हा एक संसर्गजन्य आजार आहे. या विषाणूचे शेळ्या मेढ्यांमधील देवीच्या विषाणूशी साम्य आढळून येत असले तरी हा आजार शेळ्या मेंढ्यांना होत नाही. हा आजार जनावरांपासून मानवासही होत नाही.

ह्या आजाराची देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याचे प्रमाण अधिक असते. हा रोग सर्व वयोगटातील ( नर आणि मादी) जनावरात आढळतो. मात्र लहान वासरात प्रौढ जनावरांच्या तुलनेत प्रमाण अधिक असते. उष्ण आणि दमट हवामान रोगप्रसार होण्यास अधिक पोषक असते. हा रोग उन्हाळ्यात अधिक प्रमाणात आढळतो. मात्र हिवाळ्यात या रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो.

या आजाराचा रोग दर हा सर्वसामान्यपणे १०,२०% तर मृत्यूदर १-५% पर्यंत आढळून येतो. आजारामुळे होणाऱ्या मरतुकीचे प्रमाण कमी असले तरी रोगी जनावरे अशक्त होत जातात. त्यांचे दुग्धउत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते, तसेच काही वेळा गाभण जनावरात गर्भपात होतो आणि प्रजननक्षमता घटते. पर्यायाने पशुपालकाचे आर्थीक नुकसान होते. या रोगात त्वचा खराब झाल्याने जनावर खुप विकृत दिसते.

या संकटाचा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने युद्ध स्तरावर मोहीम सुरू केली आहे. त्या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी राज्य पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी आकोट तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांचे समवेत जिल्हाधिकारी निमा अरोरा, मुख्य कार्यपालन अधिकारी विनय कटियार, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.जगदीश बकतूरे, विभागीय पशुसंवर्धन सह आयुक्त डॉ. गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गजानन दळवी, पशुधन विकास अधिकारी डॉ.सोनोने,

सहा. आयुक्त डॉ. बावणे, डॉ.धुळे डॉ.राठोड आकोट उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे हे होते. आकोट पशुसंवर्धन टीमने आतापर्यंत तालुक्यातील ७१९३ जनावरांचे लसीकरण केले असून २७४ गोठ्यांची फवारणी केल्याचे यावेळी सांगण्यात आले. आकोट तालुक्यात युद्ध पातळीवर गुरांचे लसीकरण सुरू आहे. यासाठी डॉ.पी.जी. घावट, डॉ. किसन तायडे, सहकारी धम्मदीप वानखडे, कृष्णा आवारे,हरिनारायण मरकाडे,चंद्रकांत मैघने ही टीम कार्यरत आहे.

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन लंपी हा संसर्गजन्य रोग असल्याने तो येण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता पशुपाकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

हा आजारआढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.निरोगी जनावरांना बाधित जनावरापासून वेगळे बांधावे. बाधित आणि निरोगी जनावरे एकत्रित चरायला सोडू नये. तसेच गायी आणि म्हशी एकत्र बांधू नये, म्हशींना स्वतंत्र ठेवण्याची व्यवस्था करावी. साथीच्या काळात बाधित जनावरे आणि मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. बाधित परिसरात निर्जंतुक द्रावणाची फवारणी करावी. त्याकरिता १ टक्के फॉर्मलीन किंवा २ ते ३ टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल २% यांचा वापर करावा.

या रोगाचा प्रसार बाह्य कीटकाद्वारे (डास, माशा, गोचीड इ.) होत असल्याने निरोगी जनावरांवर तसेच गोठ्यात औषधांची योग्य प्रमाणात फवारणी करावी. तसेच बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. गोठा आणि परिसर स्वच्छ हवेशीर ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही यांची दक्षता घ्यावी.

सध्या भारतात या रोगावरची लस उपलब्ध नाही. मात्र शेळ्यात देवीवर वापरण्यात येणारी लस वापरून हा रोग नियंत्रणात आणता येवू शकतो. बाधित गावांमध्ये आणि बाधित गावापासून ५ किलोमीटर त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांमधील ४ महिने वयावरील गाय आणि म्हैस यांचे लसीकरण करावे.

प्रादुर्भावग्रस्त भागात तसेच १० किमी. परिघातील जनावरांची ने आण वाहतूक बंद करावी. तसेच जनावरांचे बाजार, यात्रा, पशुप्रदर्शने बंद ठेवण्यात यावेत. या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी. त्यावर मृत जनावरांच्या खाली व वर चुन्याची पावडर टाकण्यात यावी.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: