Monday, December 23, 2024
Homeमनोरंजन‘रावरंभा’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत अनावरण सोहळा...

‘रावरंभा’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत अनावरण सोहळा…

मुंबई – गणेश तळेकर

हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि छत्रपती शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी ,मारणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या गाथा आपल्याला माहित आहेत. पण या वीरांच्या पाठीमागे सावलीसारखी ठामपणे उभी राहणाऱ्या निर्व्याज प्रेम करणाऱ्या त्यांच्या सखीची गोष्ट खचितच आपल्याला माहित असते. कित्येक आया बहिणींनी स्वतःचे कुंकू वाहिले तेव्हा कुठे हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले आहे.

स्वराज्यासाठी तलवारीशी लगीन लागलेला ‘राव’ अन त्या तलवारीची खडी ढाल ‘रंभा’ यांची रांगडी प्रेमकहाणी उलगडून दाखविणारा निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार निर्मित आणि अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘रावरंभा’ हा ऐतिहासिक चित्रपट १२ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या प्रेमकथेचे मोरपंखी पान उलगडून दाखविणारा भव्य संगीत अनावरण सोहळा कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

याप्रसंगी रंगमंचावर शिवकाळ अवतरला. संगीत अनावरणाचे औचित्य साधून चित्रपटातील कलाकारांनी ऐतिहासिक वेशात रंगमंचावर येत आपल्या भूमिकेची छोटीशी झलक उपस्थितांना दाखविली. ‘आधी स्वराज्य मग आपला संसार’ हे ब्रीद मानणाऱ्या रावजीला आपल्या प्रेमासाठी कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागतं याची चित्तथरारक आणि रोमहर्षक कथा ‘रावरंभा’ चित्रपटातून उलगडणार आहे.

यावेळी बोलताना निर्माते शशिकांत शीला भाऊसाहेब पवार म्हणाले की, ‘सातारा ही स्वराज्याची चौथी राजधानी. आम्ही साताऱ्याचे तर पहिला चित्रपट हा महाराजांवरच असावा आणि आमच्या पूर्वजांनीही आपल्या भूमीसाठी रक्त सांडले त्या पूर्वजांना आणि छत्रपती शिवरायांना आदरांजली देण्यासाठी आम्ही ‘रावरंभा’ चित्रपटाच्या निर्मितीचं पाऊल उचललं.

या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपट उद्योगाचा अनुभव घेताना महाराजांचा पराक्रम आणि साहस याची प्रचिती चित्रपटातून अनुभवयाला मिळणं हे आमच्यासाठी भाग्याचं असल्याचे सहनिर्माते डॉ. अजित भोसले आणि संजय जगदाळे यांनी सांगितले. ऐतिहसिक चित्रपटाची मोट बांधणं एक आव्हान असतं. कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्माते यांच्या सहकार्यामुळेच हा चित्रपट यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकल्याची भावना दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

चित्रपटातील गीतांना आपल्या मातीचा गंध असून शिवकाळात घेऊन जाणारी, मनाला भिडतील अशी ही गाणी करताना खूप समाधान लाभल्याची भावना संगीतकार अमितराज आणि गायिका आनंदी जोशी, गायक रवींद्र खोमणे यांनी यावेळी व्यक्त केली.

‘साथ साथ’, ‘हां मर्दा’ अशी स्फुरण चढणारी गीते आणि ‘तुझ्या दावणीला’, ‘एक रंभा एक राव’ या प्रेमगीताचा नजराणा चित्रपटातील गीत-संगीतातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून उतरलेल्या या गीतांना आदर्श शिंदे, आनंदी जोशी, हर्षवर्धन वावरे, रवींद्र खोमणे या गायकांचा स्वरसाज लाभला आहे. संगीतकार अमितराज यांनी ही सर्व गीते संगीतबद्ध केली आहेत. व्हिडिओ पॅलेसकडे चित्रपटाच्या गीताचे हक्क आहेत.

‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा, संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे.

साहसदृश्ये शेवोलिन मलेश यांची आहेत. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. ध्वनीसंकलन दिनेश उच्चील, शंतनू अकेरकर यांचे आहे. प्रशांत नलवडे निर्मिती व्यवस्थापक आहेत. १२ मे ला ‘रावरंभा’ ही ऐतिहासिक प्रेमकहाणी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: