देशात श्रद्धा वालकर हिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून फेकल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एक प्रकरण समोर आलंय, पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या नेव्हीतून निवृत्त झालेल्या वडिलांची हत्या केली आणि करवतीने त्याचे तुकडे केले. या प्रकरणी पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा येथील बरुईपूर भागात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. मुलाने त्याच्या निवृत्त नेव्ही वडिलांसाठी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर तपासात गुंतलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी तपास केला असता मुलाने व त्याच्या आईसह वडिलांची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याआधी करवतीने त्याच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर रोजी एका तलावातून प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला कुजलेला मृतदेह सापडला होता. ५५ वर्षीय माजी नौदल अधिकारी उज्ज्वल चक्रवर्ती यांची ही कहाणी आहे. उज्ज्वल चक्रवर्ती यांनी 2000 मध्ये निवृत्त होण्यापूर्वी भारतीय नौदलात नॉन-कमिशन्ड अधिकारी म्हणून काम केले.
15 नोव्हेंबर रोजी मृताच्या नातेवाइकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली, मात्र प्रकरण उघडकीस येताच मुलानेच वडिलांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. 14 नोव्हेंबर रोजी कुटुंबात भांडण झाले होते. भांडण इतके वाढले की, मुलाने वडिलांवर हल्ला केला, यात वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर मुलाने वडिलांच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी नौदल अधिकारी उज्ज्वल चक्रवर्ती यांनी 22 वर्षांपूर्वी भारतीय नौदल सोडले होते आणि ते इतर दोन खासगी कंपन्यांमध्ये काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वलला दारू पिण्याची वाईट सवय होती. पोलिसांनी सांगितले की, सध्या तलावाच्या पृष्ठभागावर तरंगत असलेल्या मृतदेहाचा केवळ कुजलेला वरचा भाग सापडला आहे. पत्नी आणि मुलाने त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांचा तपास सुरु आहे.