Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayतथाकथित पत्रकाराला आकोट न्यायालयाचा दणका…. दंडासह दुप्पट रक्कम देण्याचा आदेश…सोबत २ वर्षे...

तथाकथित पत्रकाराला आकोट न्यायालयाचा दणका…. दंडासह दुप्पट रक्कम देण्याचा आदेश…सोबत २ वर्षे कारावास…धनादेश अनादरण प्रकरण…

आकोट – संजय आठवले

आकोट शहरातील एका निवासी संकुलातील फ्लॅटचे खरेदीखत करतेवेळी दिलेले दोन धनादेश वटविल्या न गेल्याने एका तथाकथित पत्रकाराचे विरोधात आकोट न्यायालयाने दोन्ही धनादेशातील रकमेच्या दुप्पट रक्कमेसह दंड भरण्याचा आणि दोन वर्षे कारावासाचा तसेच दंड न भरल्यास सश्रम कारावास भोगण्याचा फैसला सुनावला आहे. या फैसल्याने हादरलेला तथाकथित पत्रकार सद्यस्थितीत फरार झाल्याचे वृत्त आहे.

घटनेची हकीगत अशी कि, शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक शशिकांत बजरंगलाल अग्रवाल यांनी निर्माण केलेल्या पुष्प संकेत निवासी संकुलातील फ्लॅट क्रमांक ३०२ ची विक्री केली. हा फ्लॅट रविराज युवराज मोरे नामक एका तथाकथित पत्रकाराने खरेदी केला. खरेदी व्यवहार पूर्ण करतेवेळी रविराज मोरे याने शशिकांत अग्रवाल यांना ७,५०,००० व २,५०,००० असे दोन धनादेश दिले. निर्धारित वेळी हे दोन्ही धनादेश विक्रेत्याने वटविणेकरिता बँकेत जमा केले. मात्र त्या धनादेशातील रक्कमच बँकेत जमा नसल्याने हे दोन्ही धनादेश अनादरीत झाले.

त्यामुळे सदर कथित पत्रकाराने आपल्याला गंडविल्याची अग्रवाल यांची खात्री पटली. म्हणून मग त्यांनी न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी आकोट व्ही. एम. रेडकर यांचे न्यायालयात कलम १३८ निगोशिएशन इन्स्ट्रुमेंट कायद्यानुसार दोन दावे दाखल केले. न्यायालयाने हे दोन्ही दावे मान्य करून त्यांचे निरसन करणेकरिता प्रकरण सुरू केले. त्याकरिता वादी व बचाव पक्षांचे वतीने त्यांचे बयान व साक्षी पुरावे नोंदविण्यात आले.

यामध्ये फिर्यादी शशिकांत अग्रवाल यांनी स्वतःची साक्ष नोंदविली. सोबतच आपले बयानाचे पुष्ट्यर्थ त्यांनी सक्षम पुरावाही नोंदविला. त्यामध्ये सदर दोन्ही धनादेश खरेदीखताचे मोबदल्यापोटी खरेदीदाराने आपल्याला दिल्याचे त्यांनी नमूद केले. याउलट आरोपी रविराज मोरे याने हे आरोप फेटाळून लावले आणि हे दोन्ही धनादेश केवळ सुरक्षितता म्हणून देण्यात आले असा बचाव केला. आपले बयानाचे पुष्ट्यर्थ त्याने आणखी तीन साक्षीदार कैलास वसंतराव अकर्ते, ज्ञानदेव कचरूजी मांडवे आणि स्वप्निल सुरेश मोरे यांचे पुरावे नोंदविले.

सदर प्रकरणात दोन्ही पक्षांकडून अंतीम युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर आकोट न्यायालयाने फिर्यादीचे साक्षपुरावे ग्राहय धरले. आणि आरोपीचा बचाव सक्षम नसल्याचा निष्कर्ष नोंदविला. आणि आरोपी रविराज युवराज मोरे याला दोन्ही प्रकरणामध्ये दोषी ठरविले.

त्यानंतर आरोपी रविराज युवराज मोरे याला संक्षिप्त फौ.मु.नं. ११६७/२०१६ प्रकरणी एक वर्षाचा कारावास व धनादेश रक्कम रू.७,५०,०००/- च्या दुप्पट रू. १५,००,०००/- व रु.१०,०००/- दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याचा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच संक्षिप्त फौ.मु.नं. ११६८/२०१६ प्रकरणी एक वर्षाचा कारावास व धनादेश रक्कम रू.२,५०,०००/- च्या दुप्पट रू.५,००,०००/- व रु. १०,०००/- दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याचा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली. या प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. प्रविण दे. वानखडे यांनी यशस्वी बाजू मांडली.

आकोट न्यायालयाचे या निकालानंतर आरोपी रविराज युवराज मोरे हा फरार झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे हा इसम स्वतःला पत्रकार म्हणवित असून अनेक ठिकाणी त्याने लोकांची फसवणूक केल्याची माहिती आहे. या संदर्भात विविध ठिकाणी त्याचेवर गुन्हेही दाखल झालेले आहेत.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: