आकोट – संजय आठवले
सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता गिरीश जोशी यांनी पाठविलेल्या पत्रातील मुद्द्यांसंदर्भात अधीक्षक अभियंता अकोला यांनी कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प विभाग अकोला यांना मागविलेल्या मुद्देनिहाय अहवालाची मागणी माहिती अधिकारान्वये केली असता अधीक्षक अभियंता अकोला यांचे कार्यालयाने चक्क कानावर हात ठेवून ही माहिती आपल्याशी संबंधित नसल्याचे पत्र मागणी करणारास पाठविण्याचा चहाटळपणा केला असून दोषारोप झालेल्या अधिकाऱ्याकडूनच ही माहिती घेण्याचा मोफतचा सल्लाही त्याला दिला आहे. या प्रकाराने अधिकारी एकमेकास वाचविण्याकरिता कशाप्रकारे धडपड करतात याची प्रचिती येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग अकोलाच्या जागतिक बँक प्रकल्प कार्यकारी अभियंतापदी प्रवीण सरनायक हे कार्यरत आहेत. त्यांच्या भोंगळ आणि अप्रमाणिक कारभाराने विभागांतर्गत होणाऱ्या कामांवर अनिष्ट परिणाम होत आहे. त्याची दखल घेऊन मुख्य अभियंता अमरावती गिरीश जोशी यांनी पत्र क्रमांक अर्थ- का- ४/ (३) / HAM ८३ A & ८३ B/२१-२२/ ९४७ दि. ४.३.२०२२ अन्वये अधीक्षक अभियंता अकोला दि.ना. नंदनवार यांना प्रवीण सरनायक यांच्यावर एकूण २५ गंभीर आरोप केलेले पत्र पाठवले.
सोबतच प्रवीण सरनायक यांच्याकडून कामे काढून घेऊन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांचे सुपूर्द करण्यास आदेशित केले. त्यावर अधीक्षक अभियंता अकोला यांनी जावक क्रमांक १३८०/ वलि-४/ निविदा/ हॅम ८३ A & B/ २०२२ दि. ४.३.२०२२ अन्वये कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प प्रवीण सरनायक यांना पत्र पाठवले. त्यासोबत मुख्य अभियंता गिरीश जोशी यांचे पत्रही जोडले. आणि या पत्रातील मुद्देनिहाय अहवाल सादर करण्यास फर्माविले. या पत्राची प्रतिलिपी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांनाही उचित कार्यवाहीस्तव अग्रेषित केली.
परंतु प्रशासकीय कामकाजात केवळ पत्रोपचार केला जातो. त्यावरील उचित कार्यवाही मात्र थंड बस्त्यातच ठेवली जाते. ज्याद्वारे अनेक चोरांकरिता रान मोकळे राहते. परिणामी हे चोर हवा तिथे हवा तसा डल्ला मारीत राहतात. हे अपेक्षित असल्याने या गंभीर आरोपांच्या २५ मुद्द्यांवरील अहवालाची मागणी संजय आठवले यांनी माहिती अधिकारान्वये केली. त्याकरिता त्यांनी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालय अकोला येथे दि.१.२.२०२३ रोजी माहिती अधिकारात अर्ज केला.
ही माहिती सहजासहजी मिळणार नाही याची त्यांना खात्री होती. आणि झाले ही तसेच. नियमानुसार एक महिना कालावधी सरता सरता २८ फेब्रुवारी रोजी त्यांना पत्र प्राप्त झाले. सदर पत्र अधीक्षक अभियंता अकोला यांच्याकडून आलेले आहे. आणि ह्या पत्रात या कार्यालयाने स्वतःच मागविलेल्या अहवालाशी आपला संबंध चक्क नाकारला आहे. या पत्रात म्हटले आहे कि,” आपण मागणी केलेली माहिती ही क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित असल्याने सदर माहिती करिता उक्त कार्यालयाशी संपर्क साधावा”.
वास्तविक हा अहवाल अधीक्षक अभियंता यांनीच मागविलेला आहे. त्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या तो त्यांचे कार्यालयात असणे अनिवार्य आहे. सोबतच तो माहिती अधिकार कायद्यान्वये मागणीकर्त्यास उपलब्ध करून देणे हा कार्यालयीन कर्तव्यपुर्तीचाच भाग आहे. त्यामुळे हा अहवाल उपलब्ध असल्यास तो माहिती मागणारास देणे अथवा या कार्यालयास अद्यापही अप्राप्त असल्यास, “हा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही” असे उत्तर या कार्यालयाने देणे अपेक्षित आहे. परंतु तसे न होता या अहवालाशी चक्क संबंधच नाकारला गेला आहे.
या भूमिकेमुळे अधीक्षक अभियंता कार्यालय प्रवीण सरनायकांना पाठीशी घालत असल्याची धारणा होणे अगदी स्वाभाविक आहे. आणि अशी धारणा होण्याजोगेच मुख्य अभियंता यांचे पत्र आहे. सरनायकांवर अतिशय गंभीर आरोप या पत्रात आहेत. सूचना देऊनही विहित कालावधीत कामे न करणे, कंत्राटदारांना अवास्तव मदत करणे, त्यांची उगीच हमी घेणे, वरिष्ठांचे मान्यतेविना बँकिंग व्यवहार करणे, कंत्राटदार कारवाईस पात्र असल्यावरही कारवाई न करणे, नियम मोडून कंत्राटदारांना देयके अदा करणे,
विभागाचे मंत्री व लोकप्रतिनिधी यांचे बैठकीत खोटे बोलणे, पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम सचिव यांच्या सूचना लाथाडणे, कंत्राटदाराने कामे केलेली नसतानाही देयके अदा करणे, सार्वजनिक बांधकाम सचिव, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांचेशी उद्धट वर्तन करणे यासह पत्राचे अखेरीस त्यांचे सचोटीवरच प्रश्नचिन्ह उभे केले गेले आहे. त्यांच्या ह्या अप्रमाणिक आणि आर्थिक बाबतीतील संशयास्पद वर्तनानेच हॅम ८३ A & B या दोन्ही कामांच्या निविदा रद्द करण्यात येऊन ही कामे त्यांचेकडून काढून घेण्यात आली आहेत.
नजीक भविष्यात सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये पदोन्नत्या होत आहेत. या यादीत प्रवीण सरनायकांचेही नाव आहे. अशा स्थितीत हा अहवाल उघड झाला तर त्यांचे मार्गात असंख्य अडचणी निर्माण होणार आहेत. शिवाय त्यांची विभागीय चौकशीही होणार आहे. आणि हे सारे त्यांचे प्रकृती स्वास्थ्याकरिता हानिकारक ठरणारे आहे. त्याकरिताच हा अहवाल दाबून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. महत्त्वाचे म्हणजे सरनायकांच्या काही गडबडजन्य कामांची माहितीही संजय आठवले यांनी त्यांच्याकडेच म्हणजे कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्प विभाग अकोला यांचेकडे मागितलेली आहे.
तिचाही अवधी पूर्ण झाला आहे. परंतु ती अद्याप दिली गेली नाही. उल्लेखनीय म्हणजे दि.१२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३३ वाजता सरनायकांनी संजय आठवले यांचे मोबाईलवर एक मेसेज केलेला आहे. पण तो वाचला जाण्यापूर्वीच डिलीट केला गेला आहे. मागितलेली माहिती दिली जात नाही. त्याऐवजी मेसेज केला जातो. आणि वाचण्यापूर्वीच तो डिलीट केला जातो. त्यामुळे सरनायकांबाबत मागितलेल्या या माहितीत त्यांचे बरेच मोठे सौख्य सामावलेले असून त्याच्या प्रकटीकरणाने सरनायक यांचे बिंग फुटण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे त्यांचा गैरकारभार उघड होण्याकरिता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वच्छता होण्याचे दृष्टीने ही माहिती उघड होणे गरजेचे आहे.