आकोट – संजय आठवले
आकोट कृउबासला इ-नाम योजनेअंतर्गत मिळालेल्या इलेक्ट्रॉनिक्स साहित्याचा अपहार केल्याप्रकरणी मुख्य प्रशासकांचे याचिकेवरून आकोट न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये आकोट कृउबासचे बडतर्फ सचिव यांना आकोट पोलिसांनी अटक केली असून त्याना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संपूर्ण राज्यातील बाजार समितीचे कामकाज ऑनलाइन पद्धतीने करण्याकरिता राज्य सरकार द्वारे राज्यातील सर्वच बाजार समित्यांना इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे वितरण करण्यात आले होते. त्या अंतर्गत आकोट बाजार समितीला १८ संगणक संच, ११ टॅब, १ लॅपटॉप, ५ प्रिंटर व अन्य साहित्य देण्यात आले होते. हे सारे साहित्य बाजार समितीचे तत्कालीन सचिव राजकुमार माळवे यांचे अधिकारात होते. त्याचवेळी सचिव आणि बाजार समितीचे संबंधित लोकांचे बिनसल्याने उभयपक्षी वादंग निर्माण झाले. तत्कालीन प्रशासकीय प्रशासक यांनी राजकुमार माळवे यांना दिनांक २२.७.२०२१ रोजी निलंबित करून त्यांना आकोट बाजार समितीमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली. त्यानंतर दिनांक ७.१०.२०२१ रोजी अशासकीय प्रशासकांनी बाजार समितीचा कार्यभार हाती घेतला.
त्यांनी आपले अधिकारात ह्या इ-नाम योजनेअंतर्गत मिळालेल्या उपकरणांचा आढावा घेतला. त्यावेळी सहा संगणक एक लॅपटॉप व चार टॅब गहाळ असल्याचे आढळून आले. त्याचे अंदाजित मूल्य चार लक्ष रुपये आहे. यासोबतच बाजार समितीस तीन क्विंटल क्षमतेचे १३३ इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे मिळालेले होते. त्यांचीही पडताळणी केली असता त्यातील केवळ ७५ वजन काटे आढळून आले. त्यातील ५८ वजन काटे गहाळ झालेले होते. त्यांचे अंदाजीत मूल्य आठ ते नऊ लक्ष रुपये होते. अशा प्रकारे अंदाजे १२/१३ लक्ष रुपयांच्या साहित्याचा माळवे यांनी अपहर केल्याची तक्रार मुख्य प्रशासक गजानन पुंडकर यांनी दिनांक ९.११.२०२१ रोजी आकोट शहर पोलीस ठाणे येथे केली. त्यावर काही कार्यवाही न झाल्याने तीच तक्रार आकोट उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोखर यांच्याकडे करण्यात आली. तिथेही प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस पोलीस अधीक्षक अकोला यांचे कडे तक्रार केली गेली. परंतु तेथेही कोणतीच हालचाल न झाल्याने शेवटी गजानन पुंडकर यांनी आकोट न्यायालयात धाव घेतली.
तिथे त्यांनी कलम १५३/३ अन्वये राजकुमार माळवे यांचे वर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. एडवोकेट मनोज वर्मा यांनी याप्रकरणी युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने माळवे यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आकोट पोलिसांनी त्यांना अटक केली.
या अटकेनंतर त्यांना आकोट न्यायालयात हजर केले असता आरोपीचे वकील सत्यनारायण जोशी यांनी जोरदार युक्तिवाद केला. राजकुमार माळवे यांना या प्रकरणात गोवले गेल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. आकोट बाजार समितीचे मुख्य प्रशासक गजानन फुंडकर आणि प्रशासक पती अतुल म्हैसणे या दोघांनाही मागील काळात बाजार समिती संचालक पदावरून पायउतार करण्यात आले होते. त्याचा आकस या दोघांच्याही मनात असून त्यांनी त्या पोटी माळवेना खोट्या आरोपात गोवले असल्याचे एडवोकेट जोशी यांनी सांगितले. आपल्या कथनाचे समर्थनार्थ त्यांनी पुरावे ही सादर केले. त्याने न्यायालय प्रभावित झाल्याचे जाणवले. त्यानंतर पोलिसांनी एक टॅब, एक संगणक व एक मॉनिटर जप्त केल्याचे सांगून सरकारी वकिलांनी आणखी काही साहित्य व कागदपत्रे जप्त करावयाचे असल्याने आरोपी करिता पोलीस कोठडीची मागणी केली. उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर विद्यमान न्याय दंडाधिकारी भानुप्रताप चव्हाण यांनी राजकुमार माळवे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.