सांगली – ज्योती मोरे.
नेमिनाथनगर कल्पद्रूम क्रीडांगणावर सुरु असलेल्या राम कथा सोहळ्यात आज प्रभू रामचंद्र आणि सीता मातेच्या विवाहाचा शाही सोहळा आज संपन्न झाला. बँड-बाजा, शहनाई, फुलांच्या अक्षता असा माहोल होता. या आनंद सोहळ्यात महिलांनी ताल धरला.
मराठीतून राम कथा आणि नाम संकिर्तन सोहळ्याचा पाचवा दिवस आज श्री राम विवाहाने लक्षवेधी ठरला. राम कथा सोहळ्यात आज पपू समाधान महाराज शर्मा यांनी श्रीराम व सीता यांच्या विवाहाची कथा सांगितली. त्याआधी हा सोहळा अत्यंत शाही पद्धतीने संपन्न करण्यात आला.
या सोहळ्याचे यजमानपद डोडिया परिवाराकडे होते. प्रभूंवर फुलांची वृष्टी करण्यात आली. जय श्रीरामचा गजर करण्यात आला. तुताऱ्या निनादल्या. रामायणाला साजेसा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो लोक मंडपात हजर होते. वधू-वरांनी पुष्पमाला घातल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. महिलांनी फेटे बांधून सहभाग घेतला. त्यांनी फेर धरला. आता रामराज्याची कथा सुरु होईल.
दरम्यान, रात्री श्रीगुरू जयवंत महाराज बोधले यांचे नामसंकिर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शेकडो महिला आणि पुरुष भक्तांनी भक्तीमय वातावरणात या सोहळ्यात सहभाग घेतला आहे.