मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने महसूल पंधरवड्याचा शुभारंभ…
अमरावती – दुर्वास रोकडे
शासकीय कार्यालयात सर्वसामान्य माणूस विविध कामे घेऊन येत असतो. याची जाणीव संबंधित कर्मचाऱ्यांनी ठेवावी. त्यामुळे संवेदनशीलपणे काम केल्यास स्वत:ची तसेच विभागाची चांगली प्रतिमा निर्माण होते. महसूल विभागातील प्रत्येकांने जबाबदारीने काम करुन राज्यात अमरावती जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
नियोजन सभागृहात महसूल दिनानिमित्त आयोजित महसूल पंधरवाडाचा शुभारंभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने केला, यावेळी ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त सचिन कलंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, अमरावती विभागाचे अपर आयुक्त गजेंद्र बावणे, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी महसूल विजय जाधव, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, आपल्याकडे काम घेऊन येणा-या सामान्य माणसाचे समाधान करा. संवेदनशीलपणे काम हाताळल्यास चांगली प्रतिमा निर्माण होण्यास मदत होईल. पूर्वीच्या आणि आत्ताच्या काम करण्याच्या पध्दतीत अमुलाग्र बदल झाला आहे. शासनाचा ऑनलाईन सेवा पुरविण्यावर भर असून त्यांचा प्रत्येकांनी आत्मसाद करावे.
महसूल संबंधित सर्व सेवा नागरिकांना विनाविलंब मिळेल यासाठी प्रयत्न करावे. सर्व विभागासोबत समन्वय साधून शासनाच्या महत्वाकांक्षी योजनाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा. कोणताहि लाभार्थी लाभापासून वंचित राहता काम नये. उत्कृष्ठ सेवेतून अमरावती जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी महसूल विभागाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मनपा आयुक्त श्री. कलंत्री म्हणाले की, महसूल विभाग हा शासनाचा मुख्य कणा असून शासनाच्या विविध योजनाचा लाभ व सेवा देण्यासाठी सर्वसामान्य माणसांचा संबंध येतो. त्यामुळे योजनांचा लाभ गरजूपर्यंत कसा देता येईल यासाठी महसूल विभागाने प्रयत्न करावे. आपल्या कामातून व्यापक लोकहित साधणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे महसूल पंधरवाडा कालावधीत नागरिकांच्या तक्रारी व प्रलंबित कामे निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. अधिकाधिक नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.
शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने अधिकाधिक लोकाभिमुख होऊन कामे करावीत व महसूल पंधरवडा यशस्वी करावा. शासनाच्या विविध योजना लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामसेवक आणि तलाठी यांनी समन्वय काम करावे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी केले.
महसूल दिनानिमत्ता आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत पात्र 3 हजार 468 महिला लाभार्थ्यांच्या प्रकरणाला तालुकास्तीय समितीने मंजुरी प्रदान करण्यात आले असून प्रातिनिधीक स्वरुपात महिलाना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. पात्र महिलांच्या खात्यात प्रतिमाह 1 हजार 500 रुपयांचे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ठ कर्मचा-यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच 563 तलाठी यांना महसूल संदर्भातील कामे करण्यासाठी लॅपटॉप व प्रिंटरचे वाटप करण्यात आले. नव्याने तलाठी पदावर नियुक्त झालेले 33 उमेदवारांना नियुंक्ती आदेश यावेळी प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी केले. संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार अनिल भटकर यांनी मानले. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.