सेवेत कायम करण्यासाठी आंदोलनाचा 29 वा दिवस…आरोग्य सेवा वाऱ्यावर..
अहेरी – मिलिंद खोंड
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी सेवेत कायम करण्याच्या मागण्यासाठी अहेरीत भीक मांगो आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे.
गेल्या 29 दिवसांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असूनही शासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी तालुक्यातील आरोग्य सेवेवर याचा परिणाम होतो आहे.
मागील अनेक वर्षापासून अतिशय तूटपुंज्या मानधनावर खेडोपाडी व शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी आपल्या जीवाची राख रांगोळी करत आरोग्य सेवा देत आहेत, नुकत्याच कोरोना महामारीत आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देवदुता सारखे कोविड महामारीवर मात करण्यासाठी रात्रंदिवस आरोग्य सेवा दिलेली आहे परंतु महाराष्ट्र शासन या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यास असमर्थ ठरत आहे परिणामी महाराष्ट्रातील तमाम कंत्राटी आरोग्य कर्मचारी रस्त्यावर उतरून टाहो फोडीत आहेत, दरम्यान समायोजनेच्या मागणीसाठी गेल्या 25 ऑक्टोबर पासून तालुका अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते .
या भीक मागो आंदोलनामध्ये अहेरी उपविभागातील तालुका भामरागड,एटापल्ली, व तालुका अहेरी येथील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी याचा समावेश आहे. बेमुदत आंदोलनाचा आजचा 29 वा दिवस आहे यात सर्व कर्मचाऱ्यांनी बहुसंख्य उपस्थिती दर्शवली.