Friday, November 22, 2024
Homeराज्यत्या तकलादू पत्रकाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला… अकोला न्यायालयाचा दणका… यानिमित्ताने त्या पत्रकारावरील...

त्या तकलादू पत्रकाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला… अकोला न्यायालयाचा दणका… यानिमित्ताने त्या पत्रकारावरील विभिन्न ठिकाणचे अनेक गुन्हे उघड…आरोपी फरार…

आकोट – संजय आठवले

आकोट शहराच्या एका शासकीय कार्यालयातील मागासवर्गीय व विधवा महिला अधिकाऱ्याला पीडा पोचविल्याने आरोपी ठरलेल्या एका तकलादू पत्रकाराने मागितलेला अटकपूर्व जामीन प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश विवेक गव्हाणे अकोला यांनी फेटाळला असून या निमित्ताने या पत्रकारावर अन्य ठिकाणीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान हा आरोपी पत्रकार फरार झाला आहे.

आकोट शहरात पत्रकार म्हणून मिरविणाऱ्या रविराज युवराज मोरे रा.आसेगाव बाजार ता. आकोट हल्ली मुक्काम अंबिका नगर आकोट ह्याने एका शासकीय कार्यालयातील मागासवर्गीय व विधवा महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची फिर्याद आकोट शहर पोलीस ठाणे येथे दाखल झाली. त्यावरून आकोट पोलिसांनी विनयभंग व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत मोरे याचेवर गुन्हा दाखल केला. त्या संदर्भात आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय आकोट येथे अटकपूर्व जामीनाकरिता याचिका दाखल केली.

परंतु जिल्हा व सत्र न्यायाधीश आकोट हे शासकीय दौऱ्यावर असल्याने ह्या याचिकेची सुनावणी प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश विवेक गव्हाणे अकोला यांचे समक्ष ठेवण्यात आली. ही सुनावणी दिनांक २ नोव्हे. रोजी ठेवण्यात आली होती. यावेळी पीडित महिलेला निजी वकील नियुक्त करावयाचा असल्याने तिला दोन दिवसांची मोहलत देऊन ही सुनावणी ४ नोव्हें. रोजी घेण्यात आली. त्यावेळी आरोपीचे वकिलाने ॲट्रॉसिटी सिद्ध करणाऱ्या कलमावर आक्षेप घेऊन ते कलम अनाठायी असल्याचा युक्तिवाद केला.

त्यावर ती महिला मागासवर्गीय आहे. गत दोन वर्षांपासून तिला पीडा पोहोचविणाऱ्या आरोपी रविराज मोरे ह्याला ते ठाऊक आहे. त्यामुळे ॲट्रॉसिटीचे कलम अगदी योग्य असल्याचे न्यायाधीश विवेक गव्हाणे यांनी स्पष्ट केले. आणि आरोपीचे वकिलांनी नेमके मुद्दे घेऊन युक्तिवाद करणेकरिता पुढील सुनावणी ६ नोव्हें. रोजी ठेवण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार दि. ६ नोव्हें. रोजी आरोपी रविराज मोरे याचे अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी आरोपीचे वकिलांनी आरोपीची बाजू मांडली. त्यावर सरकारी वकील जी. एल. इंगोले यांनी आपल्या बुलंद आवाजात जोरदार युक्तिवाद करून या अटकपूर्व जामीनाला विरोध केला.

दोन्ही कडील युक्तिवाद ऐकल्यावर प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश विवेक गव्हाणे अकोला यांनी पीडीतेची बाजू भक्कम असल्याने आरोपी रवी मोरे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यांच्या या फैसल्याने आता आरोपी रवी मोरे याचे समोर पोलिसांना शरण जाणे अथवा उच्च न्यायालयात दाद मागणे असे दोन पर्याय राहिले आहेत.

या सुनावणी करिता पीडित महिला आणि सरकारी वकील जी. एल. इंगोले यांनी जोरदार तयारी केली होती. त्याकरिता आरोपी रवी मोरे याचे संदर्भात काही दस्तावेज तयार ठेवण्यात आले होते. या दस्तावेजांमुळे रवी मोरे याचेवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.

सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अमरावती येथे आशिष सुरेश डहाके यांनी तक्रार दिलेली आहे. नोकरी लावून देण्याचे निमित्त्याने रवी मोरे व त्याचे तीन साथीदारांनी ११ लक्ष ३५ हजार रुपये लूबाडून आपली फसवणूक केल्याचे या तक्रारीत नमूद आहे. त्यावर सिटी कोतवाली अमरावती पोलिसांनी रवी मोरे व त्याचे तीन साथीदारांविरोधात भादवी ४२० + ३४ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे.

फ्रेजर पुरा पोलीस ठाणे अमरावती येथेही अंबादास नथुजी इंगोले यांनी फिर्याद नोंदविलेली आहे. रवी मोरे व त्याचे दोन साथीदारांनी नोकरी लावून देण्याचे निमित्त्याने आपलेकडून ३ लक्ष ५० हजार रुपये उकळल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यावरून फ्रेजरपुरा अमरावती पोलिसांनी रवी मोरे व त्याचे दोन साथीदारांवर भादवि ४२० + ३४ अन्वये गुन्हे दाखल केलेले आहेत.

याखेरीज तारदेव पोलीस ठाणे मुंबई येथे दाखल गुन्ह्यात BLE 2 ॲड. मुख्य महानगर ०४ न्यायालय गिरगाव मुंबई येथे रवी मोरे व त्याचे दोन साथीदार यांचेवर खटला सुरू आहे. तसेच जिल्हा व सत्र न्यायालय जालना येथे दोन गुन्ह्यांकरिता तर जिल्हा व सत्र न्यायालय वर्धा येथे एका गुन्हाकरिता रवी मोरे याचेवर खटला दाखल आहे.

येथे उल्लेखनीय आहे कि, धनादेश अनादरन प्रकरणी आकोट न्यायालयानेही रवी मोरे ह्याला दोषी ठरवून दोन वर्षे करावास व धनादेशातील रकमेच्या दुप्पट रकमेसह दंड भरण्याची शिक्षा सुनावलेली आहे. इतके सारे प्रताप केल्यानंतर हा इसम सद्यस्थितीत फरार झालेला आहे. आकोट पोलीस त्याचे मागावर असून त्याचा कसून शोध घेणे सुरू आहे.

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: