Sunday, December 22, 2024
Homeराजकीयकर्नाटकच्या जनतेने दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट थांबवली...नाना पटोले

कर्नाटकच्या जनतेने दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट थांबवली…नाना पटोले

कर्नाटकमधील विजयानंतर राज्यभरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई दि. १३ मे २०२३

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्याचे प्रतिबिंब आज कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतून दिसले आहे. दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट या भ्रष्ट डबल इंजिनला हरवून कर्नाटकच्या जनतेने धर्मांध, हुकुमशाही वृत्तीला सपशेल नाकारून सर्वसमावेशक लोकशाही मानणा-या काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही कर्नाटक प्रमाणे भाजपचा सफाया होईल असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज आला असून कर्नाटकच्या जनतेने भाजपच्या भ्रष्ट सरकारला पराभूत करून काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. काँग्रेस पक्षाने महागाई, बेरोजगारी, प्रचंड वाढलेला भ्रष्टाचार या जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणा-या ज्वलंत प्रश्नांवर निवडणूक लढवली. भारतीय जनता पक्षाने मात्र नेहमीप्रमाणे धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर जळत असतानाही कर्नाटकमध्ये रोज सभा घेऊन धार्मिक ध्रुवीकरण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होते पण कर्नाटकच्या जनतेने त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले. कर्नाटकातील जनता भाजप सरकारच्या ४० टक्के कमीशनखोरीला कंटाळली होती. नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यासह कोणत्याही भाजप नेत्यांनी कर्नाटकच्या मुद्द्यावर निवडणूक न लढवता निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला पण कर्नाटकच्या जनतेने तो हाणून पाडला. या उलट काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी आपल्या सभांमधून कर्नाटकच्या सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप जनतेपुढे मांडला त्यावर जनतेने विश्वास व्यक्त केला आणि काँग्रेस पक्षाला विजयी केले.

राहुलजी गांधी यांची भारत जोडो २१ दिवस कर्नाटकात होती. ही यात्रा ५१ विधानसभा मतदारसंघातून गेली होती यातील ३९ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. कन्याकुमारी ते श्रीनगर या ४ हजार किलोमीटरच्या भारत जोडो यात्रेने देशातील राजकारण बदलले आहे. या बदलांचे प्रतिबिंब आजच्या निकालातून दिसून आले आहे.

स्वायत्त संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्षांची सरकारे पाहणा-या, ED, CBI इन्कम टॅक्स या सारख्या संस्थांचा वापर करून विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करणा-या भारतीय जनता पक्षाला पराभूत करून कर्नाटकच्या जनतेने भाजपचा हुकुमशाही वृत्तीला जोरदार चपराक लगावली आहे. राहुलजी गांधी यांच्यावर खोट्या केसेस करून त्यांचे लोकसभा सदस्यत्व काढून घेणा-या आणि त्यानंतर लगेचच त्यांना बेघर करण्याच्या भाजप सरकारच्या कृतीविरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप होता.

कर्नाटकचे ४० टक्के कमीशनवाले भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे भाजपचे डबल भ्रष्ट सरकारची अवस्था सारखीच असून कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातील जनता ही आगामी लोकसभा विधानसभेत परिवर्तन घडवून भाजप आणि शिंदेच्या भ्रष्ट टोळीला पराभूत करेल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

कर्नाटकच्या विजयाचा राज्यभरात जल्लोष

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपचा दारुण पराभव करत १३७ जागांवर विजयी आघाडी घेत बहुमत मिळवले आहे. कर्नाटकमधील या विजयाचा जल्लोष काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यभरात साजरा केला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून विजयोत्सव साजरा केला. यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजन भोसले, संघटन सरचिटणीस प्रमोद मोरे, सचिव विनय राणे, झिशान अहमद, प्रवक्ते नासीर हुसेन यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: