Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 'या' व्हायरल व्हिडिओवर विरोधक आक्रमक...काय दडले आहे व्हिडिओत?...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘या’ व्हायरल व्हिडिओवर विरोधक आक्रमक…काय दडले आहे व्हिडिओत?…

मुंबई, दि. १३ सप्टेंबर
भारतीय जनता पक्ष आरक्षण विरोधी आहे हे सर्वश्रुतच आहे. सध्या राज्यात असलेले भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस-पवार सरकारला ओबीसी, मराठा अथवा धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नाही. हे सत्तापिपासू असून सत्तेसाठी वाट्टेल ते शब्द देऊन दिशाभूल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर “आपण बोलून मोकळे होऊन जाऊ”, असे म्हणतात यामागे काय दडले आहे? हे लक्षात येते, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या व्हायरल व्हिडिओवर बोलताना काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, मराठा आरक्षण प्रश्नावर सह्याद्री अतिथिगृहावर बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यातील व्हायरल झालेले संभाषण गंभीर आहे. राज्याच्या प्रमुख्यांना आरक्षणाचे काहीही देणेघेणे नाही असेच या संभाषणातून स्पष्ट लक्षात येते. एका समाजाला दुसऱ्या समाजापुढे उभे करायचे आणि सत्तेसाठी शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला बदनाम करायचे यात कुठलीही तमा बाळगायची नाही हे त्या व्हिडिओवरून स्पष्टपणे लक्षात येते. महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्रीच जर “आपण बोलून मोकळे होऊन जाऊ”, असे म्हणत असतील तर यात काय दडले आहे लक्षात येते. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांचा जीव घ्यायचा आहे काय ?, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते यात तथ्य असल्याचे या व्हिडिओतून दिसत आहे. शिंदे, पवार व फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राची फसवणूक केली आहे.

सत्ता येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देतो, एका महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देतो, आरक्षण देण्याची धमक फक्त फडणवीसमध्येच आहे अशा वल्गणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्या होत्या त्याचे काय झाले हे आपण पहात आहोतच. मराठा आरक्षणप्रश्नी सरकार सकारात्मक आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे पण प्रत्यक्षात यातील कोणीही आरक्षणप्रश्नावर गंभीर नाही. राज्यातील सर्व समाजाने आतातरी या सत्तापिपासू लोकांचा कावेबाजपणा ओळखावा व वेळीच सावध व्हावे, असे अतुल लोंढे म्हणाले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: