ऊसाला प्रतिटन साडे पाच हजार रुपये दर मिळावा – राजू पोवार…
राहुल मेस्त्री
यंदा उसाचा दर जाहीर करून बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू करावेत अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.याची दखल न घेतल्यास दर जाहीर केल्या शिवाय ऊस तोड देऊ नये या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे बेळगाव येथे ठिय्या आंदोलन केले होते.
त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली असून शनिवारी दि.15 रोजी आपल्या मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बैठक होऊन चर्चा होणार असून त्यावेळी ऊसाला प्रति टन ५५०० रुपये दर मिळालेच पाहिजेत , असा आग्रह धरला जाणार असल्याची माहिती रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी दिली.
राजू पोवार पुढे म्हणाले , ऊस दरासह अतिवृष्टी महापूर काळातील नुकसान भरपाई त्वरित मिळावी यासाठी रयत संघटनेतर्फे वारंवार आंदोलने मोर्चे काढून निवेदन दिले आहेत. पण त्याची दखल न घेतल्याने सलग दोन दिवस बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले. शिवाय भर पावसात पदयात्रा ही काढली. वाहतुकीची कोंडी चे कारण सांगून कार्यकर्त्यांना आंदोलनापासून परावर्तित केले त्यानंतर शेतकरी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
त्याची दखल घेऊन थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी शनिवारी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी बेंगलोर गाठणार आहेत. त्यामध्ये २०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा सहभाग राहणार आहे . त्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे काळात जागृत राहून उसाचा दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोड देऊ नये असे आव्हान राजू पवार यांनी केले.ते निपाणी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी बोलत होते.
याप्रसंगी रमेश पाटील प्रा . एच . बी . ढवणे, रमेश मोरे, एकनाथ सादळकर, गंगाराम रेंदाळे, राजू कोपर्डे, एकनाथ सूर्यवंशी, बाळासाहेब खडके, महावीर चौगुले, नामदेव साळुंखे, बाळासाहेब पाटील, संजय नाईक, रमेश शिंदे, बाबासाहेब सूर्यवंशी , शिवाजी वाडेकर, सदाशिव भेंडे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते