Thursday, October 24, 2024
Homeगुन्हेगारी३२ लक्ष रुपये अपहाराचा कसूर चौकशी अंती प्रमाणित…जिल्हा उपनिबंधक अकोला यांचे सह...

३२ लक्ष रुपये अपहाराचा कसूर चौकशी अंती प्रमाणित…जिल्हा उपनिबंधक अकोला यांचे सह ४ अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार…

आकोट – संजय आठवले

अवसायनात निघालेल्या संस्थेच्या मालमत्ता विक्री प्रकरणात नियमबाह्यपणे प्रक्रिया राबवून त्यायोगे जिल्हा उपनिबंधक अकोला यांनी ३२ लक्ष रुपयांचा अपहार केल्याचे चौकशी अंती प्रमाणित झाले आहे. त्या संदर्भातील चौकशी अहवाल सहकार आयुक्त तथा निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे पाठविण्यात आल्याने अकोला जिल्हा उपनिबंधक अडचणीत आले असून त्यांचे सह ४ अधिकारी कारवाईच्या फेऱ्यात अडकले आहेत.

अकोला शहरातील दी ब्रिजलाल बियाणी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही संस्था अवसायनात निघाली होती. या संस्थेच्या मालमत्तेची विल्हेवाट लावणेकरिता अवसायक म्हणून एस. डब्ल्यू. खाडे व सह अवसायक म्हणून गोपाळ कुलकर्णी सहाय्यक अधिकारी श्रेणी २ व व्ही. व्ही. सपकाळ लेखापरीक्षक श्रेणी २ ह्या ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हा उपनिबंधक व्हि. डी. कहाळेकर यांनी केली होती. या अवसायक मंडळांने सदर संस्थेची गोरक्षण रोडस्थित कोठारी वाटिका संकुल क्रमांक २ मधील २ दुकाने विक्रीस काढली.

अवसायनातील संस्थेची मालमत्ता विक्री करणेकरिता सहकार विभागाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना पारित केलेल्या आहेत. त्यानुसार ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मात्र जिल्हा उपनिबंधक कहाळेकर यांचे सूचनेनुसार अवसायक मंडळाने ऑफलाइन पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली. या सोबतच या दोन्ही दुकानांच्या बाजार मूल्यातही हेरफेर केला. बाजार भावानुसार ही दोन्ही दुकाने प्रत्येकी २५ लक्ष रुपये म्हणजेच एकूण ५० लक्ष रुपये किमतीची होती.

मात्र खरेदीदारास लाभ देण्याचे हेतूने अवसायकांनी या दोन्ही दुकानांचा एकत्रित बाजार भाव १८ लक्ष २० हजार रुपये ठरविला. आणि त्यावर अधिक २१ हजार रुपये आकारून ही ५० लक्ष रुपये किमतीची दोन्ही दुकाने केवळ १८ लक्ष ४१ हजार रुपयांना विकली. त्यामुळे ह्या विक्री प्रक्रियेत तब्बल ३२ लक्ष रुपयांचा अपहार करण्यात आला. अकोला येथील विवेक खंडेराव टाले यांना ह्या लीलाव प्रक्रियेत हिस्सा घ्यायचा होता. परंतु या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया राबवील्याने ते या प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत.

सोबतच या लिलावात शासनाला तब्बल ३२ लक्ष रुपयांचा गंडा घातला गेला. या प्रकाराने व्यथित झालेल्या विवेक टाले यांनी सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवर पुणे मुख्यालयाने चौकशी लावली. त्याकरता राजेश लव्हेकर विभागीय निबंधक सहकारी संस्था अमरावती यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले गेले. त्यांनी या संदर्भात सुनावणी घेऊन उभय पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले.

त्यानंतर त्यांनी या प्रकरणी स्वयंस्पष्ट अभिप्रायासह आपला अहवाल पुणे मुख्यालयाला सादर केला. मात्र विवेक ताले यांनी या अहवालावर अविश्वास दर्शवून या प्रकरणी फेर चौकशीची मागणी केली. त्यानुसार या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून संजय कदम विभागीय सहनिबंधक नागपूर यांची नियुक्ती केली गेली. त्यांनी या प्रकरणी पुन्हा सुनावणी घेतली. त्यादरम्यान दोन्ही पक्षाने सादर केलेल्या दस्तऐवजांचीही पडताळणी केली गेली.

या पडताळणीमध्ये अकोला जिल्हा उपनिबंधक व्हि. डि. कहाळेकर, सहाय्यक उपनिबंधक तथा अवसायक एस. डब्ल्यू. खाडे, गोपाळ कुलकर्णी सहाय्यक अधिकारी श्रेणी २ तथा व्ही. व्ही. सपकाळ लेखापरीक्षक श्रेणी २ या चौघांनीही कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाले. त्यावर चौकशी अधिकारी संजय कदम यांनी आपला अहवाल पुणे मुख्यालयाकडे पाठविला आहे. या अहवालाने उक्त चारही अधिकारी अडचणीत आले आहेत. कोणतेही क्षणी या चौघांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

यासोबतच आपल्या अधिकार क्षेत्रात कहाळेकर यांनी विविध प्रकरणी केलेल्या नियुक्त्या, दिलेले प्रभार यांचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांनी आपले वेगवेगळे उल्लू सिधे करण्याकरिता हे सारे प्रकार केल्याचे उघडकिस येऊ शकते. परंतु कहाळेकर अनेक राजकीय बहूबलींच्या संपर्कात असल्याने त्यांचेवरील कारवाईच्या तत्पर अंमलबजावणी बाबत साशंकता आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: