गोंदिया – राजेशकुमार तायवाडे
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील सर्व गरजु लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया द्वारे आज नविन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात पाटील यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनेच्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, कृषि अधिकारी पवन मेश्राम, जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक कैलाश गजभिये व धम्मदिप बोरकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
याप्रसंगी पाटील म्हणाल्या, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजु लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरीता जिल्हा माहिती कार्यालयाचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेवून सदर योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक उपसंपादक कैलाश गजभिये यांनी केले. प्राप्ताविकातून त्यांनी सांगितले की, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हा यामागचा उद्देश आहे. अनुसूचित जाती उपयोजना 2023-24 अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाअंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना,
अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींसाठी निवासी शाळा, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचतगटांना मिनी टॅक्ट्रर व उपसाधनांचा पुरवठा करणे, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह इत्यादी योजनांचा यात समावेश आहे.
जिल्ह्यात आजपासून एकूण 4 चित्ररथ 95 दिवस फिरणार असून जिल्ह्यातील प्रत्येकी 2 तालुक्यातील गावोगावी जावून सदर चिररथाद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजु लाभार्थ्यांनी सदर योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे करण्यात येत आहे.
कार्यक्रमास तहसिल कार्यालयात विविध कामासाठी येणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक धम्मदिप बोरकर यांनी मानले.