Thursday, November 21, 2024
Homeराज्यअकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारीचे गूढ कायम...

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारीचे गूढ कायम…

इच्छुकांची भाऊ गर्दी, काँग्रेसकडून आणखी एका उमेदवाराचा दावा!

अकोला जिल्ह्यात अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम असे पाच विधानसभा मतदारसंघ आहे. यापैकी सर्वात जास्ती संवेदनशील समजला जाणारा असा अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवाराचे गूढ कायम ठेवल्याने इच्छुकांची चांगलीच धाकधूक वाढली आहे.

मात्र हाच मतदार संघ हवा अशी अनेकांची इच्छा आहे. या मतदार संघासाठी इच्छुकांची आधीच भाऊगर्दी झाली आहे. अशातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी देखील या मतदार संघावर दावा केला आहे यासाठी त्यांनी दिल्ली वारी देखील केली असल्याचे समजते. इंटक नेते प्रदीप वखारिया या मतदार संघासाठी आता काँग्रेसकडून प्रबळ दावेदार असल्याची चर्चा राजकीय गटात सुरू आहे.

भाई प्रदीप वाखारिया हे काँग्रेसचे जुने जाणते नेते आहेत. सुरुवातीच्या काळापासून ते काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत.त्यांचा कामगारांसाठीचा संघर्ष सर्वश्रुत आहे. काँग्रेस इंटक कोट्यातून 30 -अकोला पश्चिम विधानसभा मधून उमेदवारी मिळण्यासाठी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनीथला यांच्या भेटीला प्रदिपकुमार वखारिया हे दिल्लीला गेले असल्याचे कळते.

आणि त्यांची अकोला पश्चिम मतदार संघासाठी उमेदवारी निश्चित समजल्या जात आहे. मात्र याच मतदार संघासाठी काँग्रेसचे युवा नेते साजिद खान पठाण यांची पूर्वीपासूनच प्रबळ दावेदारी आहे. त्यामुळे आता काँग्रेस हायकमांड कडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

या मतदारसंघात उमेदवारी मागण्यासाठी काँग्रेस पक्षात तब्बल 20 इच्छुकांची मोठी यादी आहे. यामध्ये पंधरा जणांनी वेगळा गट निर्माण केला असून उर्वरित इच्छुकांची भूमिका ही तटस्थ आहे. एका दावेदाराच्या उमेदवारीला पंधरा जणांचा उघड विरोध आहे. विशेष म्हणजे गत निवडणुकीत सुद्धा या उमेदवाराला उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली होती.

मात्र स्वतःच्या भरवश्यावर या उमेदवारानी मतदारसंघात अथक परिश्रम घेत 70 हजार मतदानाचा ऐतिहासिक असा टप्पा गाठला होता. आताही लोकसभा निवडणुकीत या उमेदवारानी आपले उंबरठे झिजवत या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले होते हे विशेष. आणि हे नाव सर्वश्रुत आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांमध्ये तिकिटासाठी इच्छुकांनी भाऊगर्दी केली आहे. रविवारी भारतीय जनता पक्षाने आपली 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, त्यामध्ये अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांना उमेदवारी जाहीर केली.

तर वंचित बहुजन आघडीने सुद्धा सोमवारी यादी जाहीर करत त्यामध्ये मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात डॉ. सुगत वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी मात्र एकाही राजकीय पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले नसल्याने या मतदारसंघात गूढ कायम आहे.

महायुतीत हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा हक्काचा असल्याने या मतदारसंघात भाजपाच उमेदवार देणार यात काही शंका नाही. गेल्या सहा निवडणूक पासून भाजपचे स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. अपराजित आमदार म्हणून त्यांची या मतदारसंघात वेगळीच पकड होती.

मात्र गत निवडणुकीत काँग्रेसचे साजिद खान पठाण यांचा निवडणुकीत मोठे मतदान घेत त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यांच्या या मताधिक्याने भाजपाने चांगलीच धास्ती घेतली होती तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा अकोला पश्चिम मधून प्रथमच काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना मोठी लीड मिळाली.

तर या मतदारसंघात लालाजींच्या निधनानंतर अनेक वर्षापासून या मतदारसंघावर डोळा असलेले भाजपाचे इच्छुक यांनी फिल्डींग लावली आहे. तर कोणाला उमेदवारी दिल्यास नाराज असलेले बंडखोरी करण्याचे सुद्धा मोठे आवाहन भाजपा पक्ष श्रेष्ठींपुढे उभे ठाकले आहे. या सर्व बाबी बघत भाजपाने या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यासाठी मोठा सावध पवित्रा घेतला असल्याचे दिसून येत आहे.

तर महाविकास आघाडीत या मतदारसंघाला घेऊन काँग्रेस आणि शिवसेना ( उबाठा ) यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मध्यंतरी या मतदारसंघाला घेऊन मोठी बॅनर बाजी सुद्धा करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षात या मतदारसंघात घडलेल्या जातीय दंगली यामुळे हा मतदारसंघ अतिशय संवेदनशील स्वरूपाचा मानला जात आहे. तर शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस मधील इच्छुक या मतदारसंघात उमेदवारी मिळण्यासाठी मुंबईला तळ ठोकून बसले आहे.

अश्यातच काँग्रेसला गत निवडणुकीत आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले मताधिक्य बघता इच्छुकांनी मोठी भाऊगर्दी मुंबईला केली आहे. तर मागील निवडणुकीत साजिद पठाण यांनी भाजपाला दिलेली कडवी झुंज बघता काँग्रेस पुन्हा त्यांनाच या मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरवणार असल्याचे समजते. मात्र अद्यापही उमेदवारी जाहीर न झाल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

वंचितची वेट अँड वॉच भूमिका

या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून सध्या वेट अँड वॉच ची भूमिका सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीतील नाराज प्रबळ दावेदाराला वंचित आपल्या गळाला लावणार असून अंतिम क्षणी एबी फॉर्म त्याच्या हाती देणार असल्याची चर्चा रंगली आहे.

महायुतीत बंडखोरी!

महायुतीतील भाजपा या मतदारसंघातून उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार असून इच्छुकांची मोठी संख्या आहे. गेल्या सहा टर्म पासून या मतदारसंघात स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा यांचे एकछत्री नेतृत्व होते. त्यांच्या निधनानंतर या मतदारसंघावर डोळा ठेवून बसलेले अनेक इच्छुक यांनी तिकीटाची मागणी केली आहे.

तर तिकिटासाठी एक वेगळा गट पक्षात सक्रिय झाला असून लालाजी यांच्या घरात तिकीट दिल्यास अथवा आमच्यापैकी कोणत्याही एका दावेदाराला तिकीट दिल्यास आपण पक्षाचे करू अन्य कोणत्याही उमेदवाराला तिकीट दिल्यास आपण पक्षाचे काम करणार नसल्याचा सज्जड दम पक्षश्रेष्ठींना या गटाने दिला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त आहे.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: