नागपूर – शरद नागदेवे
नागपूर -अधिकारी व कर्मचारी यांनी जुनी पेन्शन योजना व अन्य प्रलंबित मागण्यांबाबत राज्य शासनाच्या दुर्लक्ष व दिरंगाईच्या विरोधात दि. २९ ऑगस्ट, २०२४ पासून अधिकारी महासंघाच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन करण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. राज्यसेवेतील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांनी या बेमुदत संप आंदोलनात कर्तव्यभावनेने सहभागी व्हायचे आहे.
या पार्श्वभूमीवर, सदर संप आंदोलनाच्या यशस्वितेसाठी मार्गदर्शन व तयारी करण्याकरिता नागपूर विभागीय तसेच नागपूर जिल्हा समन्वय समितीची बैठक दिनांक 23-08-2024 रोजी दुपारी 2:30 वाजता उपायुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर यांचे कार्यालयात संपन्न झाली. या महत्त्वाच्या बैठकीत जुनी पेन्शन लागु करणे, ,सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना, सेवानिवृत्तीचे वय केंद्र व इतर 25 राज्यांप्रमाणे 60 वर्षे करणे, विविध खात्यातील रिक्त असलेली सुमारे 03 लक्ष पदे भरणे, रखडलेल्या सर्व पदोन्नती करणे, महिला अधिकार्यांना कार्यालयाच्या ठिकाणी सुयोग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देणे या व इतर जिव्हाळ्याच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.
या मागण्यांकरिता शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून, बैठका करून वेळेप्रसंगी संप करून या न्याय मागण्या मान्य करण्याबाबत शासनाला विनंती करण्यात आलेली आहे. डिसेंबर 2023 च्या नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सुद्धा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघासह राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत माननीय मुख्यमंत्र्यांनी सुधारित पेन्शन योजना आम्ही सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू करू असे आश्वासन दिले होते.
परंतु सदरच्या आश्वासनानुसार शासन अद्यापही सकारात्मक कार्यवाही करत असल्याचे दिसून येत नसल्याने नाईलाजास्तव महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ , राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना व इतर संघटना यांनी दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.या बेमुदत संपात सर्व राजपत्रित अधिकार्यांनी सहभागी होण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला राजपत्रित अधिकारी महासंघासोबत संलग्न असणार्या विविध 70 संघटनांचे अधिकारी उपस्थितीत होते. राजपत्रित अधिकारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष कमलकिशोर फुटाणे, विवेक इलमे, रमेश येवले,चंद्रभान पराते, डॉ.शांतीदास लुंगे, योगेश निंबूळकर, डॉ.प्रविण पडवे, डॉ.संजय माने, डॉ.चंद्रकांत चर्जन, संतोष हेमणे, डॉ. हर्षवर्धन मानेकर, डॉ. रुपेश नारनवरे, डॉ. संजय निकम, अरविंद उपरीकर, राजकुमार फुलझेले व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व कर्मचारी संघटनांच्या सहकार्याने संप यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला व आपली न्याय भूमिका जनतेपर्यंत व लोकप्रतिनिधीं पर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले.