आकोट – संजय आठवले
शेतातील पिके ऐन भरात असताना वन्य पशुंच्या हैदोसाने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. ह्या वन्यपशूंचा योग्य तो बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी आकोट उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेला. यासोबतच प्रादेशिक वनविभाग आकोट कार्यालयावरही शेतकऱ्यांनी हल्लाबोल केला.
सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे पीक जोमात आलेले आहे. असे असताना ह्या उभ्या पिकांमध्ये हरिण, नीलगाय, रानडुक्कर, माकडे यांच्या हैदोसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. या वन्य प्राण्यांचा एक कळप १५० ते २०० चा असतो. हे पशु एकदा शेतात घुसले की त्यांना बाहेर काढणे अतिशय त्रासाचे जाते. एक दोघेजण या कळपाला हाकलून लावू शकत नाहीत. त्यातच एका शेतातून निघाल्यानंतर हा कळप बाजूच्या दुसऱ्या शेतात जातो.
त्यामुळे या वन्य पशूंच्या सपाट्यात सापडलेले पीक नष्ट होत आहे. ह्या पशूंना मारण्यास शासनाने प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे शेतकरी तसे करू शकत नाहीत. सोबतच या नुकसानीच्या रोजच्या रोज तक्रारीही करू शकत नाहीत. तक्रारी केल्याच तर त्या नुकसानीचे पंचनामे ही होत नाहीत. वनात या प्राण्यांची सोय होत नसल्याने हे प्राणी मानवी वस्तीतील शेतीकडे धाव घेत आहेत.
त्यामुळे वनक्षेत्रातून हरिण,नीलगाय, रानडुक्कर हे प्राणी कमी झाल्याने शिकारीच्या शोधात वाघ, बिबटे, तळस, अस्वल या हिस्त्र पशुंचाही शेत शिवारांमध्ये वावर सुरू झालेला आहे. या दोन्ही प्राण्यांच्या लुकाछीपीनेही पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. अशा स्थितीत एकट्या दुकट्या शेतकऱ्याचे शेतात फिरणे कठीण झाले आहे. एकीकडे वन्य जीव संरक्षण कायद्यामुळे या पशूंची हत्या करता येत नाही. तर दुसरीकडे पिकाचे होत असलेले नुकसानही पाहावत नाही.
असे नुकसान झाल्याने आर्थिक नुकसानही सहन करावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे कसे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. ह्या सर्व बाबींनी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आकोट उपविभागीय अधिकारी तथा प्रादेशिक वनविभाग आकोट कार्यालयावर आक्रोश मोर्चा नेऊन आपल्या समस्यांचे निवेदन सादर केले.
सोबतच या वन्य प्राण्यांच्या भ्रमंतीवर अंकुश ठेवून अणि त्यांना ताबडतोब पकडून वनात सोडून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.यावेळी आकोट उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि वनपाल आर टी जगताप यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारून यासंदर्भात वरिष्ठांची चर्चा करण्याचे आश्वासन दिले.