सांगली – ज्योती मोरे
गुड्डापूर देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी भाड्यानं मागविलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीच्या ड्रायव्हरला, उलटी होत असल्याचे नाटक करून गाडी थांबवायला लावून, त्यास मारहाण करून सदर गाडी प्रवीण अशोक माळी वय 26 वर्षे राहणार कुंजीरे गल्ली, नूर हॉटेल समोर मिरज यासह त्याचे मित्र श्रेयस चौगुले आणि अक्षय पवार यांनी पळवून नेल्याची घटना 5 ऑक्टोबर 2022 रोजी जत तालुक्यातील सोरडी गावच्या माळावर घडली होती.
याबाबत पंकज अजित नंदगावे वय वर्षे 27 राहणार जुन्या पाण्याच्या टाकी शेजारी नंदगाव मळा मालगाव, तालुका मिरज यांनी जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने तपास चालू असताना सदर गाडी क्रमांक एम एच 10 डी एक्स 44 62 ही मिरजेतील नूर हॉटेल जवळ रस्त्याच्या कडेला लावली असल्याची माहिती खास बातमीदाराकडून मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पाळत ठेवून प्रवीण माळी यास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, सदर गुन्हा त्याने कबूल केला आहे. यातील दोन आरोपी मित्र फरारी झाले आहेत .आरोपी प्रवीण माळी याच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर गाडी जप्त करण्यात आली आहे.
पुढील तपास कामी आरोपीसह मुद्देमाल जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, नागेश खरात, राजू मुळे, संदीप नलावडे, संजय पाटील, सुधीर गोरे, हेमंत ओमासे, सुनील जाधव, प्रशांत माळी, ऋषिकेश सदामते, कॅप्टन गुंडवाडे., प्रकाश पाटील आदींनी केले आहे.