वीजेने मानवी जीवन सहज आणि सुसह्य केले आहे, किंबहुना वीजेशिवाय जगण्याची कल्पनाच करता येत नाही. बटन दाबल्याबरोबर घर प्रकाशमान व्हावं एवढीच रास्त अपेक्षा सर्वसामान्यांची आहे.परंतु या बटणामागे असलेली भलीमोठी वीजयंत्रणा आणि या यंत्रणेच्या माध्यमातून विजेचे नियंत्रण करणारे व २४ तास अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी रात्रंदिवस धडपड करणारी माणसे म्हणजे महावितरणचे लाईनमन.
वीज वितरण क्षेत्रात महावितरण ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. सुमारे ८१ हजार कर्मचारी, रक्तवाहिन्याप्रमाणे पसरलेल्या ११ लाख किलोमीटरच्या वीज वाहिन्या,४०१३ उपकेंद्रे, तसेच ८ लाख रोहित्राच्या माध्यमातून २५ हजार मेगावॅट वीज ,ही मुंबईचा काही भाग वगळता राज्यातील विविध वर्गवारीतील २ कोटी ८९ लाख ग्राहकांपर्यंत अखंड पोहचविण्याच काम महावितरणचा लाईनमन अविरत करत असतो.
वीजपुरवठा खंडित झाला की सर्वकाही ठप्प होते आणि वीज पुरवठा खंडित झाल्यावरच वीजेचे महत्वही कळते.परंतु गेलेली वीज परत कशी आली हे कोणी कधी जाणून घेतलं नाही किंवा तशी गरजही वाटली नसल्याने महावितरणचा लाईनमन आजवर दुर्लक्षीतच राहीला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परंतु लाईनमनच्या कामाची दखल घेत देशभरातील लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केंद्रशासनाने ४ मार्च हा ‘लाईनमन दिवस ‘ साजरा करण्याच्या सुचना सर्व सार्वजनिक आणि खाजगी आस्थापनांना दिल्या आहेत.
महावितरणमध्ये ४ मार्च हा ‘लाईनमन दिन’ साजरा करण्यात येत आहेत,त्यानिमित्ताने महावितरणच्या लाईनमनच्या कार्याची ओळख करून देण्याचा हा एक प्रयत्न. सध्यातरी बंद पडलेली वीज यंत्रणा पुर्ववत करण्यासाठी प्रत्यक्ष माणुसच लागतो.त्यामु़ळे ठप्प झालेली किंवा रात्री- बेरात्री खंडित झालेला वीज पुरवठा पुर्ववत होतो,तथापि ते पुर्ववत करण्यासाठी त्याठिकाणी महावितरणचा लाईनमन प्रसंगी प्रतिकूल आणि धोकादायक परिस्थितीत खांबावर, रोहित्रावर चढुन काम करतो असतो,तेंव्हाच खंडित झालेली वीज पुर्ववत होते हे याठिकाणी आवर्जुन नमुद केले आहे.
वीजपुरवठा खंडित झाला की तो पूर्ववत होईपर्यंतचा प्रतीक्षा काळ हा वीजग्राहकांना नकोसा असतो, वीज दिसत नाही. वीजयंत्रणेत काम करण्याचा कितीही वर्षांचा अनुभव असला तरी विजेशी मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या क्षणी अनावधानाने झालेली चूकही जीवावर बेतू शकते. याची अनेक उदाहरणे देता येतील, एवढ्या धोकादायक क्षेत्रात महावितरणचा हा सैनिक आपले कर्तव्य बजावत असतो.
महावितरणची उघड्यावर असलेली संपूर्ण यंत्रणा,जंगल ,दऱ्या -खोऱ्यातून आलेल्या वीज वाहिन्या,वीज खांबे,रोहित्रे इत्यादीवर उन,वादळ -वारा,पाऊस याचा मोठा परिणाम होत असतो.त्यामुळे वीज यंत्रणेची नियमित देखभाल – दुरूस्ती करतांना किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर प्रसंगी एखादा फॉल्ट शोधण्यासाठी शेकडो किलो मीटर वीज वाहिन्यांचे पेट्रोलिंग करावे लागते,पावसाळ्यात ,तर अशा आव्हानांची नियमितपणे भर पडत असते आणि महावितरणचा लाईनमन या आव्हानांना समर्थपणे पेलत असताे.
करोना सारख्या महामारीने संपूर्ण जगाला कुलूपबंद केले होते. त्यात तौक्ते सारख्या वादळाने राज्याच्या कोकण किनारपट्टीवरील संपूर्ण वीज यंत्रणा विस्कळीत केली होती.परंतु अत्यावश्यक सेवा असल्यांने सर्वकाही वीजेवरच निर्भर असतांना महावितरणच्या लाईनमनने जीवाची पर्वा न करता चोखपणे या काळात रात्रं -दिवस अखंडित सेवा देण्याचे काम केले.त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेण हे त्यांचे कौतूक करणारे आणि त्यांचा आत्मविश्वास वृदिंगत करणारे आहेत.
एकेकाळी फक्त पुरूषप्रधान असलेल्या या क्षेत्रात “लाईन वुमनही” पुरूषांच्या खांद्याला खांदा लाऊन सक्षमपणे या क्षेत्रातील आपले कर्तव्य बजावत आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्यावरच लाईमनचे काम थांबत नाही तर,विविध वर्गवारीतील वीज ग्राहकांना नविन वीज जोडणी देणे,वीजबिलाची वसुली करणे,वीज चोरी पकडणे,थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करणे,ग्राहकांच्या तक्रारी सोडविणे इत्यादी कामे नित्याचाच भाग असणाऱ्या महावितरणच्या या जीगरबाजाला ४ मार्च “लाईनमन दिना “निमित्य मानाचा मुजरा!