किरण बाथम /कोकण ब्युरो चीफ
फळांचा राजा अशी ओळख असलेल्या हापूस आंब्यांचा हंगाम सुरू होण्यास आणखी दीड ते दोन महिन्यांची प्रतीक्षा आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी मार्केट यार्डातील फळबाजारात देवगड हापूसची पहिली पेटी दाखल झाली. आठवड्यापूर्वी मुंबईतील बाजारात देवगड हापूसची पहिली पेटी विक्रीस पाठविण्यात आली होती.
पहिल्या पेटीला ४२ हजारांचा भाव
देवगड हापूसचा हंगाम फेब्रुवारी महिन्यात सुरू होतो. हंगाम सुरू होण्यास आणखी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी आहे. आंब्यांच्या हंगामाची खवय्यांना प्रतीक्षा असते. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर भागातील शेतकरी जयेश कांबळी यांनी देवगड हापूसची पेटी विक्रीस पाठविली आहे.
कांबळी यांच्या बागेत आंब्याची ४०० झाडे आहेत. ऑक्टोबर महिन्यात काही निवडक झाडांना फळे आली. या फळांची पेटी बाजारात विक्रीस पाठविण्यात आली, असे आंबा उत्पादक शेतकरी जयेश कांबळी यांनी सांगितले.