मुंबई – गणेश तळेकर
गेले काही दिवस गाजत असलेल्या दामोदर नाट्यगृह व सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलनाची दखल घेऊन जेष्ठ कामगार नेते आमदार सचिनभाऊ अहिर यांनी सहकारी मनोरंजन मंडळाच्या कार्यालयात नाट्यकर्मीची भेट घेतली.
सोशल सर्विस लीगच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पामुळे दामोदर नाट्यगृह व सहकारी मनोरंजन मंडळ आदी उपक्रमांच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
नुकत्याच संपलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत सर्वश्री प्रविण दरेकर यांनी लक्षवेधी उपस्थित केल्यावर आमदार सचिन अहिर, प्रसाद लाड, एकनाथ खडसे आदी सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. स्वतः मा उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.
या एकूण पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी रंगकर्मीची भेट घेतली. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद तांबे, कार्यकारिणी सदस्य व आंदोलनाचे समन्वयक श्री. रविराज नर, जेष्ठ कलाकार निलंबरी खामकर आदींनी नाट्यकर्मीना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती दिली.
सोशल सर्विस लीगने सहकारी मनोरंजन मंडळाचा वीज आणि पाणीपुरवठा बंद केल्याने गेल्या दिड महिन्यापासून संस्थेचे कामकाज ठप्प असल्याकडेही श्री रविराज नर यांनी लक्ष वेधले. आंदोलकांच्या मागण्या योग्य असून त्याला सर्वतोपरी सहकार्य करम्याचे व शासन दरबारी वाचा फोडण्याचे आश्वासन मा. आमदार श्री. सचिन अहिर यांनी उपस्थित रंगकर्मीना दिले.
जागेच्या किमतीपुढे नाटक आणि कलेची किमंत कवडीमोल होते की काय असे वातावरण निर्माण झालेलं असताना सत्ताधारी पक्षासोबतच विरोधी पक्षानेही दामोदर नाट्यगृहाच्या प्रश्नावर नाट्यकर्मीची बाजू उचलून धरल्याने नाट्यकर्मीमध्ये आश्वासक वातावरण निर्माण झाले आहे.
यानिमित्ताने दामोदर नाट्यगृहाच्या जागेवरच दामोदर नाट्यगृहाचे निर्माण होईल आणि सहकारी मनोरंजन मंडळालाही पूर्वीप्रमाणेच दामोदर नाट्यगृहात स्थान मिळेल अशी खात्री नाट्यकर्मी आणि नाट्यरसिकांना वाटू लागली आहे.