Sunday, December 22, 2024
Homeराज्यजालन्यातील निर्दोष मराठा बांधवांवर सरकारच्या आदेशानेच लाठीचार्ज...नाना पटोले

जालन्यातील निर्दोष मराठा बांधवांवर सरकारच्या आदेशानेच लाठीचार्ज…नाना पटोले

‘इंडिया आघाडी’वरुन जनतेचे लक्ष वळवण्यासाठी जालन्यात लाठीचार्जची घटना.

मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या फडणवीसांच्या आश्वासनाचे काय झाले..?

मुंबई – देशभरातील महत्वाच्या पक्षांचे नेते मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आले असताना या बैठकीचा संदेश देशभर जाऊ नये व इंडिया आघाडीच्या बैठकीपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सत्तेतील भाजपाने जालन्याची घटना घडवून आणली. आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजातील निर्दोष बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला.

हा लाठीचार्ज सरकारच्या आदेशानेच झाल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जालन्यातील घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे. पोलिसांनी लहान मुले, महिलांवरही लाठीहल्ला केला, त्यात अनेक लोक जखमी झाले आहेत.

राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, हे सर्व सत्तेतील हुकुमशाही व्यवस्थेचा परिणाम आहे. सरकारच्या आदेशाशिवाय पोलीस एवढे धाडस करणार नाहीत. निर्दयीपणे लोकांवर पोलिस हल्ला करण्यात आला. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. निरपराध लोकांवर हल्ला करुन विरोधकांवर आरोप करण्याचे पाप भाजपा करत आहे.

आगीत तेल ओतण्याचे काम भाजपाचे आहे, काँग्रेसचे नाही. काँग्रेस नेहमीच शांततेच्या मार्गाने सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन काम करत असते. देशात जातनिहाय जनगणना केल्याशिवाय सर्व समाज घटकांना न्याय मिळणार नाही. काँग्रेस पक्षाची तीच भूमिका असून जातनिहाय जनगणना करण्यास भाजपाचा मात्र विरोध आहे.

सत्तेत आल्यावर २४ तासात आरक्षण देण्याच्या वल्गणा देवेंद्र फडणवीस यांनीच केल्या होत्या. धनगर समाजाला आरक्षण देतो, मराठा समाजाला आरक्षण देतो अशी आश्वासने फडणवीस यांनीच दिली होती मग आता काय झाले, सत्तेत येऊन वर्ष झाले अजून का आरक्षण दिले नाही.

ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा घोळ सुद्धा फडणवीसांनीच घातला आहे आणि विरोधकांवर उलटे आरोप करतात, याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. जनतेने भाजपाचा खरा चेहरा ओळखला असून बदमाश भाजपाला सत्तेतून बाहेर काढण्याचा निर्णय जनतेने घेतलेला आहे.

उद्या दिनांक ३ सप्टेंबरपासून जनसंवाद यात्रा.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या दिनांक ३ सप्टेंबरपासून राज्यभर जनसंवाद यात्रा काढली जात आहे. राज्यातील पाच विभागात एकाचवेळी ही जनसंवाद यात्रा काढली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील आष्टी या स्वातंत्र्य सैनिकांच्या गावातून मी (नाना पटोले) स्वतः या पदयात्रेची सुरुवात करत आहे.

ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे, केंद्रातील व राज्यातील भाजपाचे सरकार जुमलेबाज आहे. शेतकरी, तरुण व गरिबांना या सरकारने फसवले आहे. महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे, भाजपाच्या या भ्रष्ट व लुटेरे सरकारची पोलखोल या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून केली जाणार आहे. जनतेशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्याही ऐकून घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: