Monday, December 23, 2024
Homeकृषीशेतकरी पॅनलचे उपोषण मागे…पण व्यापाऱ्यांचा पेच कायम…

शेतकरी पॅनलचे उपोषण मागे…पण व्यापाऱ्यांचा पेच कायम…

कास्तकार वाऱ्यावर…. तर मुख्य प्रशासक दौऱ्यावर… रविवारी प्रशासक व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक…

आकोट – संजय आठवले

आकोट बाजार समितीमध्ये कापूस खरेदी सुरळीत सुरू करण्याकरिता शेतकरी पॅनलने सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. परंतू व्यापाऱ्यांच्या संदर्भातील पेच मात्र अद्यापही सुटलेला नाही. त्यासंदर्भात येत्या रविवारी बोलाविलेल्या प्रशासक आणि व्यापाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत मुख्य प्रशासक व व्यापारी यांच्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. बाजार समितीमध्ये इतक्या घडामोडी घडत असताना मुख्य प्रशासक मात्र अज्ञात स्थळी दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक कास्तकारांची परवड सुरू झाली आहे.

आकोट बाजार समितीच्या मुख्य प्रशासकांनी २० कापूस व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित केले आहेत. हा तुघलकी निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी ना कुणाशी चर्चा केली ना कापूस खरेदीची पर्यायी व्यवस्था केली. परिणामी कापुस बाजार ओस पडला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक कास्तकार मात्र त्यांचा काहीही दोष नसताना अडचणीत आले आहेत. ही अडचण दूर करून कापूस खरेदी त्वरित सुरू होण्याकरिता शेतकरी पॅनलच्या नेत्यांनी आमरण उपोषणाचे शस्त्र उपसले.

त्यावर अकोला उपनिबंधकांनी मध्यस्थी करावी असे प्रयत्न सौ.भारतीताई गावंडे आणि महाव्हाईस यांनी केले. त्याची दखल घेऊन अकोला उपनिबंधकांनी त्यांचा प्रतिनिधी म्हणून सहाय्यक उपनिबंधक तथा आकोटचे प्रभारी खाडे यांना मध्यस्थीकरिता आकोट येथे पाठवले. त्यांनी उपोषणकर्ते व नाराज व्यापारी यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. त्यावेळी व्यापाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. परंतु त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही.

त्यामुळे या प्रकरणीय येत्या रविवारी म्हणजे ११ डिसेंबर रोजी बाजार समितीचे सभागृहात प्रशासक, व्यापारी, शेतकरी पॅनलचे नेते आणि शेतकरी यांची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीमध्ये मुख्य प्रशासक व व्यापारी यांच्यातील वादावर चर्चा करून तोडगा काढण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी पॅनलच्या नेत्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती सहा. उपनिबंधक खाडे यांनी केली. त्याला प्रतिसाद देऊन शेतकरी पॅनलने हे उपोषण मागे घेतले आहे.

एकीकडे आकोट बाजार समितीच्या प्रांगणात इतके सारे रामायण घडत असताना दुसरीकडे ज्यांच्या अहंकाराने हे सारे रान पेटले ते मुख्य प्रशासक गजानन पुंडकर मात्र अज्ञातस्थळी दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता आपण व्यापाऱ्यांच्या बैठकी करिता वाशिम येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या ह्या उत्तराने आकोट येथील कापूस खरेदीकरिता वाशिम येथील व्यापाऱ्यांना पुंडकर आमंत्रित करणार असल्याचे स्पष्ट झाले.

परंतु त्यांच्या या स्पष्टीकरणाने अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. आकोट येथील व्यापारी तोडगा काढण्याकरता राजी असताना वाशीम येथील व्यापाऱ्यांना आकोटात बोलाविण्याचे कारण काय? मुख्य प्रशासक म्हणून पुंडकर वाशिमच्या व्यापाऱ्यांशी चर्चा करू शकतात तशी आकोटच्या व्यापाऱ्यांशी का करीत नाहीत? वाशिमचे व्यापारी आकोटात आलेच तर येथील कापूस काय भावाने खरेदी करतील?

खरेदी केलेला कापूस आकोट येथून वाशिमला नेण्याचा खर्च त्यांनाच करावयाचा असल्याने वाशिमचे व्यापारी आकोटतील कापूस कमी दराने घेणार नाहीत काय? ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही काय? त्याऐवजी आकोटच्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात कोणती अडचण आहे? गजानन फुंडकर आकोट बाजार समितीचे सभापती असतानाही कापसाच्या सौदा पट्टीवर “ओला हलका माल वापस” हे चार शब्द लिहिले जात होते. तेव्हा त्यांनी ह्या चार शब्दांवर आक्षेप घेतला नाही.

मग आताच त्यांना या शब्दांचा बाऊ का वाटू लागला? वास्तविक या चार शब्दांमुळे व्यापाऱ्यांनी आजवर एकाही शेतकऱ्याला अडचणीत आणलेले नाही. कुणाचाही कापूस खरेदी विना परत गेलेला नाही. मग पुंडकराना त्या शब्दांचा आताच राग का आला? आणि रागही इतका की त्यांनी चक्क २० कापूस व्यापाऱ्यांचे परवाने पंधरा दिवसांकरिता निलंबित केले. इतके करूनच ते थांबले नाहीत तर त्यांनी या व्यापाऱ्यांच्या बँकांना पत्र पाठवून त्यांचे व्यवहारही थांबविण्याची सूचना दिली.

त्यामूळे पुंडकर बाजार समितीचे मुख्य प्रशासक नसून व्यापाऱ्यांचे व्यक्तिगत शत्रु असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुंडकरांनी असे करण्याचे कारण काय? असे करून आकोटच्या व्यापाऱ्यांना बाजार समितीतून हद्दपार करावयाचे आहे काय? या प्रश्नांच्या भाऊ गर्दीतच गजानन पूंडकर यांनी अमरावती लाच प्रतिबंधक विभागाकडे आकोट बाजार समितीच्या सेसबाबत काहीतरी तक्रार केल्याची माहिती आहे.

हे खरे असेल तर त्यांनी हे करण्यापूर्वी बाजार समितीच्या प्रशासकांना विश्वासात घेतले आहे काय? घेतले नसल्यास का घेतले नाही? लपून छपून ते असे का वागत आहेत? त्यांच्या मनात नेमके काय आहे? असे अनेक प्रश्न पुन्हा निर्माण झाले आहेत. वास्तविक गजानन फुंडकर हे समितीचे मुख्य प्रशासक अर्थात पालक आहेत. ती जबाबदारी पार पाडताना शेतकरी व बाजार समिती यांचे हितार्थ वर्तन करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे.

मात्र त्यांच्या ह्या दुराभिमानी स्वभावाने शेतकरी, बाजार समिती आणि व्यापारी तिन्ही घटक अडचणीत आले आहेत. कापूस खरेदी बंद झाल्याने शेतकरी, व्यापार बंद झाल्याने व्यापारी तर सेस बुडत असल्याने बाजार समिती. मूळात बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या उन्नतीकरिता स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित जोपासणे बंधनकारक आहे. त्याकरिता बाजार सुरळीत सुरू राहणे अगत्याचे आहे. परंतु गत पाच सहा दिवसांपासून बाजार बंद आहे.

शेतकरी अडचणीत आला आहे. बंद बाजारामुळे समितीचा सेस बुडत आहे. हे सारे मुख्य प्रशासकामुळे घडत आहे. नियमानुसार पाहू गेल्यास शेतकरी व बाजार समितीस बाधा पोहोचविण्याचे वर्तन हे अपात्र असण्याचे वर्तन आहे. हे वर्तन करून गजानन पुंडकर स्वतः शेतकरी व बाजार समितीस बाधा पोचवीत आहेत. परंतु दुसरीकडे मात्र बाजार समितीमधील व्यापारी नवीन बाजार समिती सुरू करण्याकरिता डावपेच करीत असल्याचे पुंडकर बोलत आहेत.

परंतु ते धडधडीत खोटे बोलत आहेत. कारण आकोटात नवीन बाजार समिती २०१६ मध्ये स्थापन झालेली आहे. तेव्हापासून आतापर्यंतही या बाजार समितीतील एकही व्यापारी तिथे गेलेला नाही. जुन्या बाजार समितीमध्ये आताही कापूस खरेदी सुरळीत सुरू होती. शेतकऱ्यांची कोणतीही तक्रार नव्हती. परंतु सौदा पट्टीवर पूर्वापार लिहिल्या जात असलेल्या “ओला हलका माल वापस” या चार निरर्थक शब्दांचे स्वतःच भांडवल करून गजानन फुंडकर यांनीच चालू खरेदी बंद पाडली.

त्यानंतर व्यापाऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता चक्क वीस कापूस व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित केले. त्यानंतर त्यांच्या बँकांना पत्र देऊन त्यांचे व्यवहारही बंद करण्याची सूचना केली. यावरून व्यापाऱ्यांनी या बाजार समितीमध्ये राहू नये, तर त्यांनी नवीन बाजार समितीमध्ये जावे असे प्रोत्साहन गजानन फुंडकरच देत असल्याचे स्पष्ट होते.

यामुळेच जुन्या बाजार समिती मधून व्यापारी पळवून लावण्याकरिता गजानन पुंडकर यांनी नवीन बाजार समितीच्या संचालकांकडून सुपारी घेतली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नवीन बाजार समितीच्या संचालकांशी त्यांचे संबंध अतिशय मधुर असल्याचीही चर्चा आहे. परंतु ही चर्चा केवळ चर्चाच आहे हे सिद्ध होण्याकरिता गजानन पुंडकर यांना येत्या रविवारी होणाऱ्या संयुक्त बैठकीमध्ये उपस्थित राहणे गरजेचे आहे. तिथे व्यापाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढणे, कापूस खरेदी सुरळीत सुरू करणे आणि शेतकऱ्यांना दिलासा देणही गरजेचे आहे.

परंतु रविवारी असे झाले नाही आणि “ओला हलका माल वापस” या चार निरर्थक शब्दांकरिता गजानन पुंडकर यांनी ताणून धरले तर त्यांचे संदर्भात शहरात सुरू असलेली चर्चा ही सत्य आहे हे आपोआपच सिद्ध होईल. त्यामुळे फुंडकर यांनी सुपारी घेतल्याची चर्चा सत्य असल्याचे सिद्ध होते की ते बाजार समितीचे कर्तबगार मुख्य प्रशासक आहेत हे सिद्ध होते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. यासोबतच या चार निरर्थक शब्दांना व्यापाऱ्यांनीही ताणून धरू नये. बाजार समितीमध्ये वांधा समिती आहे.

त्या ठिकाणी ओल्या हलक्या मालाबाबत नेहमीच तडजोड होत आलेली आहे. तडजोडीनंतर त्याचा दर ठरवून तो माल व्यापाऱ्यांनी घेतलेलाही आहे. अशा समजूतदारपणाची व्यापारी आणि शेतकरी यांची तयारी असल्यामुळे या चार शब्दांसाठी वाद निर्माण व्हावा ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे.

गजानन पुंडकरांसारखे मुख्य प्रशासक हे चार दिन की चांदनी आहेत. परंतु शेतकरी आणि व्यापारी यांचे पिढी दर पिढीचे अतूट ऋणानुबंध आहेत. त्याच भरोशावर ही बाजार समिती चालत आहे. हे संबंध ध्यानात घेऊन व्यापार्‍यांनीही येत्या रविवारी ताणून धरू नये अशी जाणकारांची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: