Friday, September 20, 2024
Homeराज्यआमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या इशाऱ्यापुढे सरकार नमले...

आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांच्या इशाऱ्यापुढे सरकार नमले…

तिवसा पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर

अमरावती – दुर्वास रोकडे

तिवसा – नगरोत्थान अभियानांतर्गत सादर करण्यात आलेल्या तिवसा नगरपंचायत पाणीपुरवठा प्रकल्पाला अखेर राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला आहे. तिवसा मतदारसंघाच्या आमदार ॲड.यशोमती ठाकूर यांनी सातत्याने हा प्रश्न लावून धरला होता. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले होते.

त्यानंतरही सरकारकडून कारवाई होत नाही हे पाहून सरकारला दिलेल्या आंदोलनाच्या सज्जड इशाऱ्यानंतर अखेर सरकार नमले आहे. सरकारने या पाणीपुरवठा योजनेचा निधी मंजूर केला आहे. या संदर्भात आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले असून अखेरीस या सरकारला जाग आली आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगरपंचायतीच्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. अनेक वेळा आंदोलने केली, अखेरीस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर उशिरा का होईना मुर्दाड सरकारला जाग आली असून सरकारने निधी मंजूर केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील तिवसा नगरपंचायतीमधील पाणीपुरवठा योजना ताबडतोब सुरू करा, गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांकडे याबाबतची फाईल मंजुरीसाठी पडून असल्याने ती ताबडतोब मंजूर करावी, अशी आग्रही मागणी आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात केली होती. तिवसा नगरपंचायतीतील पाणीपुरवठा योजना गेल्या अनेक महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत होती.

तिवसा नगरपंचायतीमधील नागरिकांच्या पाण्याचे भीषण हाल सध्या सुरू आहेत. ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित न झाल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात स्थानिक आमदार आणि माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच याबाबत सरकारला जाग येत नसल्याने विविध आंदोलने ही केली.

शहराचा पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत रु २८.९९ कोटी रुपयांचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरी घेऊन पुढील कारवाई व प्रशासकीय मान्यता मिळावी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयात प्रलंबित होता. तिवसा शहरांतील नागरिकांना दरवर्षी पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नदीला व डोह जो स्त्रोत आहे त्यात योजनेसाठी कृषी पाणी मुबलक आहे पण एकच टाकी आहे त्यामुळे (स्टोरेज) नाही, वितरिका नाही, शहराचे विस्तारिकरन होत आहे. विहिर अधिग्रहण करून नागरिकांना अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा केला जात आहे.

या संदर्भात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा एकदा सभागृहांमध्ये हा प्रश्न ॲड. ठाकूर यांनी मांडला होता. त्यानंतर ही हालचाल होत नाही हे पाहिल्यानंतर दिलेल्या सज्जन इशाऱ्यानंतर अखेरीस सरकारने या योजनेसाठी 27 कोटी 91 लाख मंजूर केले आहेत. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला असून याबाबतचा कार्यादेश 18 महिन्यांसाठी असणार आहे.

18 महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना आदेशाद्वारे देण्यात आले आहेत. राज्य शासनातर्फे प्रकल्पासाठी 95% म्हणजे 26 कोटी 51 लाख अनुदान देण्यात येणार असून नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा म्हणजेच तिवसा नगरपंचायतीचा 5% म्हणजे एक कोटी 39 लाख रुपये सहभाग असणार आहे, तिवसा पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाने निधी मंजूर केल्याबद्दल ॲड.ठाकूर यांनी आनंद व्यक्त केला असून आता तिवसा नगरपंचायतीतील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: