आकोट – संजय आठवले
अडगाव येथील इतिहास प्रसिद्ध युद्धाचे वेळी आकोट येथे आलेल्या नागपूरकर रघुजीराजे भोसले यांनी आकोट शहरात तिन गणेश मंदिरे बांधल्याचे सांगण्यात येत असून शहरातील सोमवारवेस येथे व नर्सिंग महाराज मंदिराचे डावीकडे अद्यापही दोन गणेश मंदिरे या आख्यायिकेची आठवण करून देत आहेत. आकोट तहसीलच्या परिसरातील तिसरे मंदिर मात्र यवनांच्या तडाख्यात उध्वस्त झाल्याचे बोलले जाते.
दिल्ली सम्राट अकबराने राज्यकारभाराच्या सोयीच्या दृष्टीने त्याच्या साम्राज्याचे 15 सुभे तयार केले होते. त्यातील नरनाळा हा एक सुभा होता. औरंगजेबापर्यंत नरनाळा मुघलांचे सत्तास्थान राहिला.सन १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला. त्यानंतर औरंगजेबाने ओलीस ठेवलेल्या संभाजी पुत्र शाहू ह्यास कैदेतून सोडले गेले. त्यावेळी ताराराणी साहेब ह्या मराठी राज्याची धुरा सांभाळत होत्या. त्यांनी संभाजी पुत्र शाहूस तोतया घोषित केले.
आणि शाहूची सत्यता पडताळणीसाठी नागपूरचे परसोजी भोसले यांना शाहूकडे पाठविण्यात आले. शाहू हा संभाजी पुत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा नातू असल्याचे परसोजींनी प्रमाणित केले. आणि सर्वप्रथम शाहूच्या पक्षास जाऊन मिळाले. परसोजी शाहूस मिळाल्याने शाहूचे पारडे जड झाले. परिणामी शाहूंचा मराठी साम्राज्यावरचा हक्क प्रस्थापित झाला. ह्या ऋणाची परतफेड करण्याकरिता छत्रपती शाहूंनी परसोजी भोसले यांना सेना साहेब सुभा हा खिताब व नरनाळा सुभा बहाल केला.
तेव्हापासून नरनाळा व आकोट परिसरात नागपूरकर भोसले यांचा अमल जारी झाला. कालांतराने या सुभ्याचा कारभार जाणोजी भोसले यांचे कडे आला. त्यांची पत्नी दर्याबाई ही आकोट येथे वास्तव्यास होती. हे वास्तव्य सोमवारवेस येथे असल्याचे सांगितले जाते.
तो काळ अतिशय धामधुमीचा असून “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग” अशी गत होती. त्यानुसार सन १८०३ मध्ये व्यंकोजी भोसले, दौलतराव शिंदे आणि रघुजीराजे भोसले यांची अडगाव या ठिकाणी इंग्रजांशी गाठ पडली. या ठिकाणी झालेला तह मराठा इतिहासात प्रसिद्ध आहे.
ह्या तहानंतरच रघुजी राजे भोसले यांनी आकोट येथे येऊन तीन गणेश मंदिरे बांधल्याचे बोलले जाते. त्यात सोमवार सोमवारवेस येथे उजव्या सोंडेच्या गणेशाचे, नर्सिंग महाराज मंदिराचे बाजूला डाव्या सोंडेच्या गणेशाचे, तर तहसील परिसरात उर्ध्वमुखी गणेशाचे मंदिरांचा समावेश आहे. तहसील परिसरातील हे उर्ध्वमुखी गणेशाचे मंदिर काही कारणाने लुप्त झाले आहे. मात्र उर्वरित दोन्ही मंदिरे भग्न अवस्थेत आल्याने त्यांचा आता जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
त्यामुळे ह्या दोन्ही मंदिरांचा तोंडावळा बदलला असला तरी त्यातील गणेश मुर्त्या मात्र त्याच कायम आहेत. ह्या मुर्त्या पाहताच त्यांच्या ऐतिहासिक असल्याची साक्ष मिळते. असे असले तरी मात्र या दोन्ही मंदिरासंदर्भात कोणताही लिखित दस्तावेज उपलब्ध नाही. सन १९१० च्या गॅझेट मध्येही या मंदिरांचा उल्लेख नाही. परंतु नरसिंग बुवा, केशवराज, यात्रा चौकाच्या पश्चिमेकडील टेकडीवरील पीर शाह दर्या साहेब, नरसिंग विद्यालयातील गडा नारायण, नंदीपेठ येथील नंदिकेश्वर, सोमवार वेस येथील नानासाहेब, तहसील वरील गैबी पीर या धार्मिक स्थळांचा उल्लेख या गॅजेट मध्ये आहे.
आकोट शहरा भोवती तटबंदी असून तटाला खानापूर वेस, सोमवारवेस, एलीचपुरवेस, आंबोडी वेस, धारूर वेस, बुधवार वेस अशी नावे असलेले सहा दरवाजे असल्याचे नोंद गॅजेट मध्ये आहे. मात्र आकोट शहरा भोवती आठ गावांचा समूह होता. केसोरी, जोगबन, धबडगाव, केमलापूर, चापानेर, औरंगाबाद, नंदिग्राम, खानापूर-त्रंबकपूर ही ती गावे. ह्या आठ गावांच्या कोटात वसलेले असल्याने आकोटला आठकोट म्हटले जायचे. परंतु आठकोट उच्चारताना जिभेला आट पडत असे.
त्यामुळे आठकोटचा अपभ्रंश होऊन त्याचे आकोट झाले. आकोट म्हणजे कोटापर्यंत. परंतु काही विद्वानांनी त्यातही बदल करून त्याचे अकोट केले. मात्र आकोट भोवती कोट असल्याने अकोट नाही तर आकोट हाच उच्चार संयुक्तिक असल्याची खात्री पटते. परंतु हा उल्लेखही गॅजेटमध्ये नाही.
ह्या बाबी गॅझेटमध्ये नसल्या तरी मात्र त्याबाबतच्या आख्यायिका आजही तुटक तुटक का होईना ऐकायला मिळतात. whatsapp युनिव्हर्सिटीच्या काळात ह्या आख्यायिकाही आता हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर शेवटचा आचका देत आहेत. त्यामुळे ह्या गणेश मंदिरांच्या जीर्णोद्धारकर्त्यांनी या इतिहासाची माहिती घेऊन पुढील पिढीसाठी हा स्मरणाचा ठेवा जतन करून ठेवावा अशी अनेकांची भावना आहे.