विकास कामात तारेचे कुंपण, गोदाम व लिलाव शेडचे बांधकाम होणार…
रामटेक – राजू कापसे
रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देवलापार येथील उपबाजार आवारात विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा सभापती सचिन किरपान यांच्या नेतृत्वातील संचालक मंडळाचा मानस असून त्या दृष्टीने उपबाजाराला संरक्षणासाठी तारेचे कुंपण, भव्य गोदाम व आडतियांना बोली करण्यासाठी लिलाव शेड अशी अनेक विकासकामे या आवारात लवकरच करण्यात येणार आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रामटेक येथील मुख्य बाजार आवारासोबतच बाजार समीतीचे देवलापार येथे उपबाजार आवार आहे,मात्र याठिकाणी अद्यापही पायाभूत सुविधांची उभारणी झालेली नाही.मागील वर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सचिन किरपान यांच्या नेतृत्वात संचालक मंडळ निवडून आले व बाजार समितीच्या रामटेक मुख्य बाजार आवारात विकासकामांचा धडाकाच सुरू झाला आहे.ही विकासकामे प्रगतीपथावर आहेत त्यातच बाजार समितीच्या संचालक मंडळाने देवलापार या आदिवासी बहुल क्षेत्रातील देवलापार येथील उपबाजारात अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
देवलापार व या भागातील सुमारे ७५ गावांना त्यांच्या भागात हक्काची बाजारपेठ नाही.या भागातील शेतकऱ्यांना त्यांचे कृषी उत्पादन विक्री करण्यासाठी रामटेक, तुमसर किंवा नागपूर येथील कळमणा येथे आपला माल न्यावा लागतो यात त्यांचा वेळ व पैसा दोहोंचा अपव्यय होतो हे लक्षात घेऊन देवलापार येथील उपबाजारात धान्य बाजार, भाजीपाला बाजार, गुरांचा बाजार -बकरा मंडी सुरू करण्यासाठी सभापती सचिन किरपान यांनी पुढाकार घेतला आहे.आगामी काळात देवलापार येथे उपबाजारात सेवा सहकारी संस्था देवलापारच्या माध्यमातून व शासनाच्या १०० टक्के अनुदानावर ६५०० वर्गफूटाचे भव्य गोदाम उभारणीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
याशिवाय या उपबाजार आवाराला सुमारे १० लक्ष रुपये खर्च करून तारेचे कुंपण करण्यात येत आहे.येथे प्रस्तावित धान्य बाजारासाठी लिलाव शेड, भाजीपाला बाजारासाठी ओटे व गुरांच्या बाजारासाठी आवश्यक असलेले रॅम्प व पाण्याचे हौद बांधकाम केले जाणार आहे.यासोबतच तिथे विद्युत व्यवस्था,सुलभ शौचालय व पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करण्यात येईल.उपबाजारात अंतर्गत रस्ते व कॉंक्रेटीकरण यासाठी बाजार समितीच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.