Friday, October 18, 2024
Homeराज्यसत्तेचा हव्यास चालला वाढत पण घसरण त्याहूनही जादा…अशाने पूर्ण होईल काय भारसाखळेंचा...

सत्तेचा हव्यास चालला वाढत पण घसरण त्याहूनही जादा…अशाने पूर्ण होईल काय भारसाखळेंचा ईरादा?… (भाग-१)

आकोट – संजय आठवले

विधानसभा निवडणूक अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपल्याने लोकसभा निवडणुकीचा ज्वर ऊतरणीस लागून विधानसभा निवडणुकीचा पारा चढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आकोट विधानसभा मतदारसंघातून सर्वच पक्षांचे नवनवे पैलवान तेल लावून हौद्यात ऊतरण्यापूर्वी आखाड्याचा अंदाज घेण्याकरिता जनमानसात प्रभाव असणाऱ्या मान्यवरांच्या दारांचे उंबरे झिजवीत फिरत आहेत. नव्या दमाच्या या फौजेत सर्व “निकषांचा घटता टक्का पण हव्यास मात्र पक्का” ठेवून तिसऱ्यांदा लढण्याच्या ईर्षेने आमदार भारसाकळे यांनी “टायगर अभी जिंदा है” ची डरकाळी बुलंद केली आहे.

दर्यापूर मतदारसंघ आरक्षित झाल्याने २००९ मध्ये प्रकाश भारसाखळे यांनी आकोट मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून चंंचू प्रवेश केला. पण त्यावेळी सासरी आलेल्या नववधूच्या बुजर्‍या भूमिकेत असल्याने त्यांना मतदारसंघाचा पूर्ण कल घेता आला नाही. परिणामी ३२ हजार मते घेऊन ते चौथ्या स्थानी स्थिरावले. त्यानंतर त्यांनी पाच वर्षे आकोट मतदार संघाचा सूक्ष्म अभ्यास केला. आणि भाजपाशी घरठाव करून पूर्ण तयारीनिशी आकोटवर चढाई केली. यावेळी त्यांनी पाटील आणि कुणबी समूहांना “अहो मी तुमचाच” म्हणून लाडिक साद घातली. आणि सहकार गटाला “तुमच्या मध्ये हस्तक्षेप करणार नाही” असे वचन देऊन आपलेसे केले.

तर दर्यापूर मतदार संघातील आपल्या प्याद्यांना आकोट मतदार संघातील नातेवाईकांकडे पाठवून “भारसाखळे म्हणजे विकास पुरुष” अशी प्रतिमा अन्य समूहांमध्ये चितारली. आश्चर्य म्हणजे भूतकाळात बाहेरील लोकांचा चांगलाच अनुभव असतानाही बाहेरच्या भारसाखळेंचा हा प्रयोग आकोट मतदार संघात कमालीचा यशस्वी झाला. इतका कि, २००९ मध्ये ३२ हजार मते घेऊन चतुर्थ श्रेणीतील भारसाखळे २०१४ मध्ये चक्क ३२ हजारांचा लीड घेऊन मेरिट श्रेणीत पास झाले.

त्यात भरीत भर म्हणजे कधी नव्हे ती आकोट नगरपालिका ही भाजपच्याच ताब्यात आली. चुकले एकच कि, भारसाखळे यांना पूर्णतः नापसंत असलेले हरिनारायण माकोडे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. हे व्यक्तिमत्व तसे संघनिष्ठ. परंतु धडाडी मात्र शून्य. त्याच दरम्यान तेल्हारा पालिका ही भाजपच्या हाती आली. आणि तिथेही भारसाखळे यांना नापसंत असलेल्या सौ. जयश्री पुंडकर ह्या अध्यक्षपदी आरूढ झाल्या. ह्या तशा कर्तबगार. परंतु माकोडे आणि सौ. पुंडकर हे दोघेही भारसाखळे यांच्याच कह्यात राहिले. त्यामुळे ह्या दोन्ही नगराध्यक्षांसह अन्य कार्यकर्त्यांनाही कुठेच मोठेपणा मिळणार नाही याची भारसाखळे यांनी पुरती काळजी घेतली. त्यामुळेच त्यांनी बहुतांश कामे पालिकेद्वारे न करता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करवून घेतली.

अशा वातावरणातच २०१९ मध्ये पुन्हा विधानसभा निवडणूक लागली. एव्हांना आकोट मतदार संघातील भाजपमध्ये बरीच चुळबूळ सुरू झाली होती. अनेकांनी भारसाखळे यांच्या पश्चात उमेदवारी करिता वरिष्ठांचे कानही भरले होते. परंतु ह्यावेळी ही भारसाखळे यांनीच बाजी मारली. पण यावेळी २०१४ चा प्रयोग जुना झाल्याने पाटील समूहाने त्यांचेकडे चांगलीच पाठ फिरवली. परिणामी भारसाखळे यांनी आपले लक्ष कुणबी समूहाकडे केंद्रित केले. अन्य समूहातील बऱ्याच चोरवाटा माहीत झाल्याने त्यांनी त्या ठिकाणाहूनही आपली मते अर्थनीतीने प्राप्त केली. परंतु ह्या निवडणुकीत त्यांचा मतांचा टक्का मात्र कमालीचा घसरला. आणि अवघ्या ७००० मतांनी त्यांची ईभ्रत राखली गेली.

आणि त्यानंतर भारसाखळे यांची कारकीर्द पुन्हा सुरू झाली ती आजता गायत. परंतु या दहा वर्षाच्या कालखंडात त्यांची कल्हई पूर्णता उडाली आहे. भारसाखळे हे मुळीच विकास पुरुष नसून ते काडीबहाद्दर, चॉकलेट किंग, अहंकारी, मत्सरी आणि अति महत्त्वाकांक्षी असल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यांच्या अति महत्त्वाकांक्षेने बरेच जुने जाणते कार्यकर्ते दुखावलेले आहेत. त्यातच कार्यकर्त्यांचा पाणउतारा करणे, त्यांना डीवचणे, प्रत्येक वेळी आपण ठणठणीत असल्याचे आवर्जून प्रतिपादन करणे आणि आपण आकोट मतदार संघातून तिरंगी ध्वजात लपेटूनच जाणार असल्याचा दंभ मिरवणे यामुळे अनेक कार्यकर्ते त्यांचे पासून आतून दुरावले आहेत.

त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परीने भारसाखळे यांचे गाऱ्हाणे श्रेष्ठींसमोर मांडले आहे. परिणामी वरच्या पातळीवरून भारसाखळे यांचा पर्याय शोधणे सुरू झाले आहे. त्यात अग्रणी आहेत डाॅ. रणजीत सपकाळ. हे सहकार चळवळीतील असून आकोट मतदार संघातीलच आहेत. महत्त्वाचे म्हणजे आकोट तेल्हारा येथील सहकार गट काँग्रेस आणि शरद पवार गटात विखुरलेला आहे. परंतु हा गट सपकाळ यांचे पाठीशी एकसंध राहणार असल्याचे संकेत आहेत. दुसरे म्हणजे सपकाळ हे आमदार रणधिर सावरकरांचे निकटस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीतच सपकाळ यांना आगामी आकर्षण म्हणून समोर आणलेले आहे.

आतील खबर आहे कि, नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांनीही सपकाळ यांना आकोटचा शब्द दिला आहे. त्यावर धोत्रे यांना आपण लीड दिल्याचा युक्तिवाद भारसाखळे करू शकतात. मात्र हा लीड मोदी शहांचा असल्याचे प्रतिउत्तर त्यांना मिळणार असल्याचे समजते. त्यासोबतच यावेळी गुजरात पॅटर्न अवलंबिण्याचे सुतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी एका खाजगी बैठकीत केले आहे. त्या पॅटर्न मधील ढासळती लोकप्रियता, वाढते वय, घटती शारीरिक क्षमता, मतांचा घसरता टक्का या परीक्षांमध्ये भारसाखळे सपशेल नापास ठरतात.

यातच दुसरा होरा असा आहे कि, डाॅ. रणजीत पाटील यांना प्रस्थापित करण्याचा फडणवीस यांचा पुरातन मानस आहे. त्याकरिता आकोट परफेक्ट आहे. ह्यावर डोळा ठेवून डाॅ. रणजीत पाटील यांच्या आकोट फेऱ्या वाढलेल्या आहेत. हा प्रयोग अमलात आल्यास भारसाखळे यांना अचलपूर येथे पाठविले जाऊ शकते. येथील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी लोकसभेत भाजप विरोधात भूमिका घेतलेली आहे. नवनीत राणा चा उजळलेला चेहरा काळवंडण्यात बच्चू कडूंचा मोठा हातभार लागलेला आहे. त्यामुळे त्यांचे विरोधात तगडा उमेदवार म्हणून तिथे भारसाखळे यांचेवर भाजप भार टाकणार असल्याची ही बोलवा आहे. (अपूर्ण)

Sanjay Athavle
Sanjay Athavlehttp://mahavoicenews.com
नमस्कार, मी संजय आठवले रा. खानापूर वेस आकोट जिल्हा अकोला. मी मागील तीस वर्षांपासून पत्रकारिता करित आहे. समाजातील असामाजिक तत्त्वे, अराजकता, भ्रष्टाचार, अन्याय या विरोधात आवाज उचलण्याचा माझा जन्मताच स्वभाव आहे. त्यातूनच महाविद्यालयीन जीवनात वाचनाशी माझा जवळून संबंध आला. आणि तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत कायम आहे. त्यानेच मराठी भाषेचे बऱ्यापैकी ज्ञान झाल्याने वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर मी छंद म्हणून पत्रकारिता करू लागलो. त्यातील शोध पत्रकारितेत मला अधिक रुची आहे. अनेक रहस्य उलगडून जगापुढे आणणे मला अत्यंत आवडते. आता मी महा व्हाईस न्यूज चा कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहे. महा व्हाईस न्यूजने पत्रकारितेचा फ्रीहँड दिल्याने विविध स्तरातील, विविध क्षेत्रातील जोखमीची पत्रकारिता मी करू शकत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: